कन्नमवार नगरमधील आणखी 139 कुटुंबांना मिळाली हक्काची घरे; शिवसेनेची वचनपूर्ती

कन्नमवार नगरमधील धोकादायक संक्रमण शिबिरामध्ये 40 वर्षे जीव मुठीत घेऊन राहणाऱया 139 रहिवाशांना आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नांमुळे म्हाडाच्या सुसज्ज टॉवरमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत. शिवसेनेने दिलेल्या वचनांची पूर्तता झाली असून आमदार सुनील राऊत यांनी या रहिवाशांना चावीचे वाटप केले. यामुळे आतापर्यंत 1040 कुटुंबांना हक्काची घरे मिळाली आहेत.

कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन लोक राहत होते. या संक्रमण शिबिरांत छप्पर गळणे, स्लॅब कोसळणे अशा घटना वरचेवर घडत होत्या. याची गंभीर दखल शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी घेतली. या पावसाळ्याआधी नवीन घराच्या चाव्या देईन असा शब्द त्यांनी रहिवाशांना दिला. त्यानुसार इमारत क्रमांक 182 ‘अ’ व ‘ब’, 183 ‘ब’ 67, 68 येथील 139 रहिवाशांना शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नवीन सुसज्ज घरांचे चावीवाटप करण्यात आले. घरांचा ताबा मिळालेल्या या सदनिका धारकांनी शिवसेना  आमदार सुनील राऊत यांचे आभार मानले. विक्रोळीतील शेवटच्या कुटुंबाला जोपर्यंत हक्काचे घर मिळत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही सुनील राऊत यांनी दिली. यावेळी स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, उपविभाग संघटिका रश्मी पहूडकर, शाखाप्रमुख अभय राणे, विजय सोनमळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या