गावाकडच्या लोकांनी घडवला…‘जैतर’

सर्वसाधारणपणे ‘मैतर’ हा शब्द आपण ऐकतो; पण ‘जैतर’ म्हणजे काय हे फारसे कुणाला सांगता येणार नाही. खान्देश प्रांतात ‘जैतर’ हा शब्द बोलीभाषेत वापरला जातो. त्याचा अर्थ आहे, हितचिंतक नसलेला…याच नावाचा सिनेमा आता 14 एप्रिल रोजी पडद्यावर येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मालेगाव येथील सोनस गावातल्या लोकांनी हा सिनेमा एकत्र येऊन घडवला आहे. सोनस गावातली गावकरी मंडळी या सिनेमासाठी निर्मात्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. ‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीनुसार या मंडळींनी सिनेमाच्या टीमला मदत केली. तब्बल 47 अंश डिग्री सेल्सिअस अशा तापमानात मालेगाव आणि परिसरात या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. विद्यार्थीदशेतील प्रेमीयुगुलाची गोष्ट या सिनेमात मांडण्यात आली आहे, असे निर्माते मोहन घोंगडे सांगतात. पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घनःश्याम पवार याने सांभाळली आहे. रजत गवळी व सायली पाटील ही फ्रेश जोडी सिनेमात आहे.