नाशिक जिल्ह्यात तीन महिन्यात चौदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

41

सामना प्रतिनिधी । नाशिक

कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन महिन्यात नाशिक जिल्ह्यात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

नापिकी, शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणेही शक्य नसल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. तणावाखाली असलेल्या अशा शेतकऱ्यांकडे भाजप सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्या रोखण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात जानेवारीत तीन, फेब्रुवारीत पाच, तर मार्चमध्ये सहा शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील तीन, येवला, सटाणा, सिन्नर येथील प्रत्येकी दोन, तर नांदगाव, चांदवड, निफाड, कळवण, देवळा या तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकरी आत्महत्येचा समावेश आहे. सात शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. पाच आत्महत्यांचे अहवाल येणे बाकी आहे. दारूचे व्यसन असल्याचे कारण दाखवून एका, तर वैयक्तिक कारणास्तव एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत नाकारण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या