ई-बाइक डीलरशिप देण्याच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक

एका ई-बाइक कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर दोघांनी संपर्क साधून येथील एका व्यापाऱ्याची 13 लाख 77 हजार रुपयांची फसकणूक केली आहे. याप्रकरणी जेल रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 6 मे 2022 दरम्यान झाला आहे.

गौतम कृष्णा आणि दीपक अग्रवाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शकील अहमद मोहिनुद्दीन पटेल (रा. अचिव्हर्स हॉलजवळ, न्यू पाच्छा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पटेल यांच्याकडून ओकिनावा कंपनीच्या एजन्सीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी लातूर येथे जाऊन ओकिनावा इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भेट दिली. तेथे त्यांना ओकिनावाच्या वेबसाइटवर डीलरशिपचा फॉर्म भरण्यास सांगितले. तसेच ‘कंपनी तुम्हाला संपर्क करेल’, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पटेल यांनी ऑनलाइन फॉर्म भरला. काही दिवसांतच त्यांना वरील दोघांनी फोन केला. ‘आम्ही ओकिनावा इलेक्ट्रिक बाइक कंपनीमधून बोलत आहोत. तुम्हाला डीलरशिपकरिता एनओसी, व्हेरिफिकेशन फॉर्म, बुकिंग करता पैसे लागतील’ असे सांगून त्यांनी वेळोवेळी 13 लाख 77 हजार रुपये ऑनलाइन भरून घेतले. 6 मेनंतर दोघांनी फोन बंद ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पटेल यांनी जेल रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान, सर्व कागदपत्रे, बँकेची कागदपत्रे, पैसे ज्या खात्याकर ट्रांजेक्शन झाले आहेत, त्याची माहिती घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली आहे. आजच माहिती देण्यात आली आहे. नेमके मोबाइल लोकेशन, कुठल्या खात्यावर पैसे जमा झाले, याबाबत माहिती घेऊन पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती जेल रोड पोलीस ठाण्याचे फौजदार बादोले यांनी सांगितले.