
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर रोखण्याची मागणी करत देशभरातील 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी 8 विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. आता विरोधी पक्षांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या पक्षांमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, जनता दल युनायटेड, भारत राष्ट्र समिती, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डीएमके आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांचा समावेश आहे.
सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप फक्त विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी करत आहे. जर विरोधी पक्षातील कोणताही नेता भाजपमध्ये सामील झाला तर त्याविरोधातील सर्व कारवाई थांबवली जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या यंत्रणांचा गैरवापर रोखावा आणि त्यात होणाऱ्या अटकसत्रासंदर्भातही दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेवर 5 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.