१४वे जागतिक मराठी संमेलन मुंबईत

शिवाजी मंदिरात शनिवारपासून उलगडणार मराठी मनाचा विचार
मुंबई – जागतिक पातळीवरील मराठी भाषिकांना एकत्र आणावे, मराठी भाषा, मराठी बाणा आणि मराठी संस्कृतीची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योग व्यवसायासाठी मराठी मनाला प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)ने १४ वे जागतिक मराठी संमेलन मुंबईत आयोजित केले आहे.

शनिवार ७ ते ८ जानेवारी रोजी दादर येथील शिवाजी मंदिरात उद्योगपती अविनाश राचमाले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. यामध्ये ‘शोध मराठी मनाचा’ अंतर्गत देशविदेशातील मराठीजन मराठीच्या वृद्धिसाठी आपले विचार मांडणार आहेत.

जागतिक मराठी संमेलनाच्या माध्यमातून चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रीडा आणि ज्ञान हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित असणार आहेत.

या संमेलनात अभिनेते सचिन पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली. संमेलनाच्या उद्घाटनानंतर समुद्रापलीकडे भाग १, वेगळ्या वाटा, सरस्वतीच्या प्रांगणात, चित्र-शिल्प-काव्य या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, तर दुसर्‍या दिवशी रविवारी लक्ष्मीची पाऊले, समुद्रापलीकडे भाग – २, माझा चित्रप्रवास यामध्ये वासुदेव कामत यांची मुलाखत होणार आहे. सारस्वत बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या या संमेलनाला जगभरातून मराठीजन उपस्थित राहणार आहेत.