श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणारच, मुस्लिम मुलीचा निर्धार

33

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अहमदाबादमधील एका १४ वर्षीय मुस्लिम मुलीने रक्षाबंधनाच्या दिवशी श्रीनगरमधील लाल चौक येथे तिरंगा फडकवण्याचं जाहीर केलं आहे. तंजीम मेरानी असं या मुलीचं नावं असून ‘जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करणार’ असल्याचं तिनं म्हटलं आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तंजीमने सांगितलं की, मागच्या वर्षी मला विमानतळावर थांबवण्यात आलं होतं आणि मी तिथेच तिरंगा फडकवला. यावर्षी मी लाल चौकवर तिरंगा फडकवणारचं. रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याचा सण असतो म्हणूनच मी हा सण निवडला आहे. राखीचा हा सण सैन्यातील जवानांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही तंजीम म्हणाली.

तंजीमच्या या प्रयत्नांना तिच्या कुटूंबियांची ही साथ आहे. तंजीमच्या वडिलांनी याबाबत म्हटलं की, ‘कश्मीरला जाण्यासाठी ही योग्य वेळ नाही. मात्र योग्य वेळीसाठी आम्ही कधीपर्यंत वाट बघायची? कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे जशी माझ्या मुलीने यासाठी सुरुवात केली आहे.’

‘हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये ही दरी कोणी निर्माण केली? आपल्या रक्ताचा रंग वेगळा आहे का?’, असा प्रश्न तंजीमच्या वडिलांनी केला. हा एक उत्सव आहे आणि आपल्याला केव्हाही यायला जायला स्वातंत्र्य आहे. ‘मी माझ्या मुलीच्या प्रयत्नांसोबत आहे. हा एक सण आहे त्यामुळे याला हिंदू-मुस्लिमांच्या चष्म्यातून पाहू नका’, असंही ते म्हणाले.

तंजीमची श्रीनगरमधील लाल चौकवर गेल्यावर्षी देखील तिरंगा फडकवण्याची इच्छा होती. मात्र १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. त्यामुळेच तंजीमला लाल चौकवर तिरंगा फडकवण्याची परवानगी मिळाली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या