एपीएमसीच्या भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट मध्ये १४०० गाड्यांची आवक

427

एपीएमसी मार्केटमध्ये शेतमालाची आज विक्रमी आवक झाली. भाजीपाला मार्केटमध्ये ११०० तर कांदा-बटाटा मार्केटमध्ये ३०० गाड्या आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात माल आल्यामुळे सर्व मार्केट आणि एपीएमसीचा परिसर वाहतूक कोंडीने पॅक झाला. मार्केटच्या सर्वच प्रवेशद्वारांवर गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. वाहने आणि नागरिकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासनाने केलेल्या सोशल डिस्टंसिंगचा अक्षरश: बोजवारा उडाला.

एपीएमसीचे भाजी मार्केट हे काल रात्री नऊ वाजल्यापासून सुरू करण्यात आले होते. मार्केटमध्ये गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने भाजीपाला मार्केटच्या बाहेर सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था केली होती. मोठ्या संख्येने आलेली वाहने आणि प्रमाणापेक्षा जास्त झालेली नागरिकांची गर्दी यामुळे सोशल डिस्टंसिंगचा पुरता बोजवारा उडाला. संपूर्ण एपीएमसीच्या परिसराला वाहतुकीच्या कोंडवाड्याचे स्वरुप प्राप्त झाले. मालाची आवक जरी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्या प्रमाणात जावक झाली नाही. ग्राहक कमी असल्यामुळे निम्मा माल विकला गेला नाही. काल रात्री आलेल्या गाड्या आज दुपारपर्यंत खाली न झाल्यामुळे माल मोठ्या प्रमाणात खराब झाला असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

पालेभाज्या फेकाव्या लागल्या
देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. याचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी आज नेहमीपेक्षा जास्त माल मागविला. एका व्यापाऱ्याने पाच-पाच गाड्या माल आणल्यामुळे मार्केट पॅक झाले. मेथी आणि कोथिंबर या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने त्या कचऱ्यात फेकाव्या लागल्या. भाजी मार्केटच्या डी आणि सी विंगच्या अवतीभोवती साचलेल्या कचऱ्यात कोथींबिरीचे मोठमोठे ढिग लागलेले होते.

दररोज फक्त २०० गाड्या
एपीएमसीमध्ये आज मोठ्या प्रमाणात माल आल्यामुळे भाजीपाला मार्केट पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे उद्यापासनू मार्केटमध्ये दररोज फक्त २०० गाड्यांना परवानगी देण्यात यावी, अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसीच्या प्रशासनाला दिल्या आहेत. नवी मुंबई शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर चेक पोस्ट तयार करण्यात येणार असून तेथून फक्त २०० गाड्यांना शहरात सोडण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या