15 बँकांमध्ये 7 हजार कोटींचा घपला, सीबीआयच्या 169 ठिकाणी धाडी

1091

देशातील 15 प्रमुख बँकांमधील तब्बल 7 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह 169 ठिकाणी धाडी टाकल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये घपला झाल्याची 35 प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर सीबीआयने छापेमारीचा धडाका लावला आहे. तपास यंत्रणेने गेल्या महिन्यापासूनच बँकांतील घोटाळेखोरांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने 15 प्रमुख बँकांतील वेगवेगळ्या घोटाळ्यांप्रकरणी 35 गुन्हे दाखल केले. त्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी देशभरात 15 राज्यांत धडाधड 169 ठिकाणी धाडी टाकल्या. यात मुंबई, ठाणे, कल्याणसह दिल्ली, गुरुग्राम, चंदीगढ, डेहराडून, नोएडा, बारामती, सिल्वासा, अमृतसर, फरीदाबाद, बंगळुरू, तिरुपूर, चेन्नई, मदुरई, क्विलॉन, कोचीन, भावनगर, सुरत, अहमदाबाद, कानपूर, गाझियाबाद, भोपाळ, वाराणसी, चंदौली, भटिंडा, गुरुदासपूर, मोरेना, कोलकाता, पटना, कृष्णा, हैदराबाद या ठिकाणांचा समावेश आहे.

या राज्यांत झाली कारवाई

महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, तामीळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादर-नगर हवेली.

घोटाळ्याशी संबंधित बँका

एसबीआय, पीएनबी, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन ओव्हरसीज बँक, इलाहाबाद बँक, कॅनरा बँक, देना बँक, पंजाब ऍण्ड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया.

बँक ऑफ महाराष्ट्रात 113 कोटींचा घोटाळा

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एसईएल मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीने 113.55 कोटींचा घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या संचालक आणि प्रवर्तकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या