व्यापारी जहाज फिलिपाईन्सजवळ बुडाले, ११ हिंदुस्थानी बेपत्ता

37

सामना ऑनलाईन । टोकियो

पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे इमरॅल्ड स्टार नावाचे एक व्यापारी जहाज फिलिपाईन्सजवळ बुडाले. या जहाजात २६ हिंदुस्थानी खलाशी होते, त्यातील १५ जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव पथक ११ हिंदुस्थानी खलाशांचा शोध घेत आहे. जपानच्या तटरक्षक दलाने ही माहिती दिली. हाँगकाँगमध्ये नोंदणी झालेले इमरॅल्ड स्टार हे जहाज फिलिपाईन्सच्या ईशान्येकडे २८० किलोमीटर अंतरावरून प्रवास करत होते, असेही जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले. मदतकार्यासाठी दोन गस्ती बोटी तसेच तीन विमाने पाठवण्यात आली आहेत. मात्र वादळामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती जपानी तटरक्षक दलाने दिली. जहाजावरील नागरिकांच्या मदतीसाठी जपान, फिलिपाईन्स आणि चीनकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या