
तळोजा येथे राहणाऱ्या 15 महिन्याच्या समिधाला( नाव बदलले आहे) गेल्या काही दिवसांपासून उलटी, भूक न लागणे, अतिसार आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीला घराजवळील नर्सिंग होममध्ये दाखल केले गेले. तेथे उपचारांना दाद देत नसल्यामुळे खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयात 17 डिसेंबरला आणले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून लगेचच तिला अतिदक्षता विभागात दाखल केले.
योग्य ते उपचार देऊनही तिची प्रकृती आणखीनच बिघडत असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्या. यामध्ये तिला चयापचयाशी संबंधित (मेटाबॉलिक डिसऑर्डर) बिटा केटोथिओलिसची कमतरता असणारा आजार झाल्याचे निदान झाले. हा हा अनुवंशिक आजार असून यामध्ये शरीरामध्ये प्रोटीनचा योग्यरितीने वापर होण्यात अडथळा येतो.
मेडिकव्हर रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. नरजॉन मेश्राम यांनी सांगितले की, अतिदक्षता विभागात असताना मुलीला अतिसार, श्वास घेण्यास त्रास होणे अशी गंभीर लक्षणे दिसत होती. ग्लुकोज देऊनही ती जवळपास कोमामध्येच होती. तिच्या शरीरामध्ये ग्लुकोज म्हणजेच शर्कराची पातळी सामान्य असूनही शरीराच्या ऊतींमध्ये किंवा द्रवपदार्थांमध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त होते. तसेच शरीरात केटोन्सची पातळी खूप जास्त होती. त्यामुळे आम्हाला तिला दुर्मिळ अशा मेटाबॉलिक आजाराची बाधा झाल्याची शंका आली. त्यामुळे तिच्या आवश्यक तपासण्या केल्या गेल्या. दरम्यान तिला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. तिला मेटाबॉलिक कॉकटेल म्हणजेच मल्टीव्हिटामिन्स आणि आयव्ही फ्लुईड देण्यात आले. तिच्या शरीरातील अतिरिक्त असिड काढून टाकण्यासाठी पेरिटोनिअल डायलिसस करण्यात आले. तीन दिवसानंतर तिची प्रकृती सुधारण्या सुरुवात झाली. काही दिवसांतच कृत्रिम श्वसनयंत्रणेशिवाय श्वास घेऊ लागली. तिची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्याने तिला गेल्या आठवड्यातच घरी सोडण्यात आले आहे.
बालकांमधील हा दुर्मिळ आजार असून याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे या आजाराचे निदान होण्यात बऱ्याचदा उशीर होतो. या मुलीमध्ये याचे निदान वेळेत झाले नसते तर शरीरातील एसिडोसिसचे प्रमाण खूप वाढले असते आणि घातक ठरले असते. यामुळे तिच्या शरीरातील चयापचय संस्था निकामी झाली असती किंवा तिचा मृत्यूही होण्याची शक्यता होती. त्यामुळे या आजारामध्ये वेळेत निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. हा अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये अधिक तपासण्या करण्यासाठीही तिचे नमुने पाठविले असून याचा अहवाल पुढील काही दिवसांत मिळेल, असे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक
हा आजार बरा झाला असला तरी या मुलीला आयुष्यभर आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असणार आहे. प्रोटीन आणि फॅट कमी असलेला असा विशेष आहाराचा समावेश जेवणामध्ये करावा लागेल. तिच्या आहाराबाबत पालकांना नेहमीच सजग असणे गरजेचे असेल. तसेच भविष्यातही तिला या आजारामुळे काही वेळेस औषधोपचार घेण्याची आवश्यकता भासू शकते, असे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
मेडिकव्हर रुग्णालयाचे सेंटर प्रमुख डॉ. नवीन के एन यांनी सांगितले की, बालकांसाठी आठ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे बालकांवर वेळेत उपचार करणे शक्य होते आणि याचा आम्हाला आनंद आहे.