बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पात सरकारचे 15 हजार कोटी रुपये पणाला

354

मुंबईतल्या बीडीडी चाळींचा कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हाडाने आखला आहे. पण वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब होत असल्याने गृहनिर्माण विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. कारण मुख्यमंत्र्यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाचे तब्बल 15 हजार 200 कोटी रुपये पणाला लागले आहेत. गृहनिर्माण प्रकल्पात एवढी प्रचंड रक्कम गुंतवण्याचा राज्य सरकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने आखला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या तीन बीडीडी चाळींच्या जागी अतिशय भव्य असे 18 ते 22 मजली टॉवर उभे राहतील. सध्या बीडीडी चाळीतील रहिवासी 160 स्क्वेअर फुटांच्या घरात राहतात. नवीन प्रकल्पात त्यांना 500 स्क्वेअर फुटांचे घर मोफत मिळेल. त्यातील नायगाव व बीडीडी चाळींचा प्रकल्प सात वर्षांत तर वरळीचा प्रकल्प आठ ते नऊ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पण प्रकल्पाला अजून पूर्णपणे गती येत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नायगावचा तिढा
नायगावच्या 42 बीडीडी चाळींतील सर्वेक्षणाला रहिवाशांनी विरोध केला आहे. बायोमेट्रिक्स पद्धतीने रहिवाशांचे सर्वेक्षण होणार आहे, पण विरोधामुळे सर्वेक्षणाचे काम रखडले आहे.

प्रकल्पाचा खर्च
– ना. म. जोशी मार्ग – सुमारे 2 हजार 400 कोटी रु.
– नायगाव – सुमारे 2 हजार 800 कोटी रु.
– वरळी – 10 हजार कोटी रु.

ना. म. जोशीमध्ये स्थलांतर
ना. म. जोशी मार्गावरील 32 इमारतींपैकी सात इमारतींचा पहिल्या टप्प्यात पुनर्विकास होईल. त्यातील सातपैकी सहा इमारतींचे बायोमेट्रिक्स पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींमधील रहिवाशांनी संक्रमण शिबिरात स्थलांतर सुरू केले आहे.

या प्रकल्पातील विरोधाचे सर्व मुद्दे मावळले आहेत. ना. म. जोशी मार्गावरच्या बीडीडी चाळींमधील रहिवासी संक्रमण शिबिरात स्थलांतरित होत आहेत. काही प्रमाणात विरोध फक्त नायगावला होता, पण तोही दूर होईल. प्रकल्प वेळेतच पूर्ण होईल.
– मिलिंद म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष म्हाडा

आपली प्रतिक्रिया द्या