शिर्डी संस्थान प्रसादालयात 15 टनाची महाखिचडी

575

महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला. यासाठी तब्बल 15 टन साहित्याचा वापर करण्यात आला. साई समाधीवर शुक्रवारी दिवसभर भगवान शिवशंकराची प्रतिमा ठेवण्यात आली होती. साई मुर्तीला करोडो रुपयांच्या सोन्याच्या अलंकार आणि तुळशीमाळांचा साज चढवण्यात आला होता.

सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्र आणि उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला. सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली. साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची आमटी आणि बटाटा शिरा असे पदार्थ बनवण्यात आले होते. दिवसभरात 70 ते 80 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असा साईसंस्थानचा अंदाज आहे.

खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी 15 टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आला. यात साबुदाणा 6395 किलो , शेंगदाणे 4687 किलो, तुप 993 किलो, साखर 340 किलो, बटाटा 2490 किलो, हिरवी मिरची 424 किलो तर लाल मिरची 100 किलो असे साहित्य महाखिचडी प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात आले. महाशिवरात्री आणि आषाढी असे वर्षातून दोनदा प्रसाद भोजनात उपवासाची खिचडी देण्यात येते. शिर्डी व पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. सोबत देशभरातून आलेल्या भाविकांनाही प्रसाद भोजनात भाजी, पोळी, वरण- भाताऐवजी साबुदाणा खिचडी मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले, असे साई प्रसादालयाचे अधीक्षक विष्णु थोरात यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या