15 ऑगस्ट, 1947 ला हिंदुस्थान स्वातंत्र्य झाला. हिंदुस्थानचा 78 वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र फक्त हिंदुस्थानच नाही तर अन्य पाच देश देखील या दिनाची वाट पाहत असतात, कारण या देशांनाही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. जाणून घेऊया हिंदुस्थानसह कोणत्या देशात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो…
1. दक्षिण कोरिया
हिंदुस्थानसह दक्षिण कोरिया देखील 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट, 1945 ला दक्षिण कोरियाने जपानकडून स्वातंत्र्य मिळवले. यूएस आणि सोविएत संघाच्या फौजांनी कोरियाची जपानच्या तावडीतून सुटका केली. हा दिवस कोरियन ‘नॅशनल हॉलीडे’ म्हणून साजरा करतात.
2. उत्तर कोरिया
दक्षिण कोरियाप्रमाणे उत्तर कोरिया देखील याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. दोन्ही देश 15 ऑगस्ट, 1945 ला जपानच्या तावडीतून मुक्त झाले. उत्तर कोरियन देखील हा दिवस ‘नॅशनल हॉलीडे’ म्हणून साजरा करतात. सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी लग्न करण्याची परंपरा येथे आहे.
3. बहरीन
15 ऑगस्ट, 1971 ला बहरीन ब्रिटनच्या जोखडातून मुक्त झाला. ब्रिटिश फौजांनी 1960 च्या दशकातच बहरीन सोडले होते, मात्र 15 ऑगस्ट, 1971 ला बहरीन आणि ब्रिटन यांच्यात एक ट्रीटी झाली होती आणि तेव्हापासून ब्रिटनने बहरीनला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. असे असले तरी बहरीन 16 डिसेंबरला नॅशनल हॉलीडे साजरा करतो, कारण याच दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलीफा याने बहरीनची सत्ता मिळवली होती.
4. कॉन्गो
आफ्रिकन देश कॉन्गोला 15 ऑगस्ट, 1960 ला स्वातंत्र्य मिळाले. हा देश फ्रान्सच्या जोखडातून मुक्त झाला. 1880 पासून हा देश फ्रान्सच्या तावडीत होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा ‘रिपब्लिक ऑफ कॉन्गो’ बनला.
5. लिकटेंस्टीन
लिकटेंस्टीन या देशाने 15 ऑगस्ट, 1866 ला जर्मनीकडून स्वातंत्र्य मिळवले. 1940 पासून हा देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. लिकटेंस्टीन हा जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे.