लग्नानंतर 16 व्या दिवशी नवरी पळवली: पिता, आई व नवऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । लातूर

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील अल्पवयीन मुलीचा विवाह 22 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आला होता. लग्नानंतर 16 व्या दिवशी त्या मुलीस सासरच्या घरातून पळवण्यात आले होते. या प्रकरणी पिता, आई आणि नवऱ्याविरुध्द पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

18 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात साकोळ ता. शिरुर अनंतपाळ येथील विजयकुमार मधुकर नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या १६ वर्षाच्या मुलीस लातूर येथून पळवून नेण्यात आले होते. या गुन्ह्यात पोलीसांनी संदीप तुकाराम मादळे याच्याविरुध्द दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात पाठवले होते. फिर्याद देणाऱ्या विजयकुमार मधूकर नाईक याने अल्पवयीन मुलीचे लग्न लातूर येथील महेश मोहळकर याच्यासोबत ६ ऑगस्ट २०१८ रोजी लावून दिले होते. लग्नानंतर १६ व्या दिवशी तिला संदिप मादळे याने पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक विलास शहाजी नवले यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९,१०,११ अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन मुलीचे वडील विजयकुमार नाईक, आई मंगलाबाई नाईक आणि मुलीचा नवरा महेश विठ्ठल मोहळकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.