पुण्यात दोघांकडून 16 किलो अफूची बोंडे जप्त; विमानतळ भागात गुन्हे शाखेची कारवाई

अफूची बोंडे हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एक आणि खंडणी विरोधी पथक दोनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 16 किलो 275 ग्रॅम अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहेत.

सोमराज सोहनलाल बिष्णोई (32), प्रेमाराम पुनाराम बिष्णोई (32, रा. दोघे. लोहगाव, मूळ.राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखा अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी विमानतळ भागात गस्तीवर होते. या दरम्यान लोहगाव भागातील श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 62 हजारांचा 16 किलो 275 ग्रॅम अफूची बोंडे हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

…दिवसा गॅस एजन्सीत काम
सोमराज आणि प्रेमाराम हे दोघेही मूळ राजस्थान येथील असून कामानिमित्ताने ते पुण्यात आले होते. लोहगाव भागात एका गॅस एजन्सीमध्ये दिवसा ते काम करतात. त्यांचे आणखी काही साथीदार असून त्यांच्यामाध्यमातून ते अंमली पदार्थ तस्करीचे काम करत असण्याची शक्यता आहे.