16 वर्षांच्या मुलाने केलं 19 वर्षांच्या तरुणीशी लग्न आणि मग…

15463

असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. ते धर्म, जात, वय, दर्जा काहीही पाहत नाही. एका 16 वर्षीय मुलाने 19 वर्षीय तरुणीशी लग्न केल्याची घटना बेंगळुरू येथे घडली आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर एक आठवडाही त्यांनी दांपत्य म्हणून व्यतित केला. पण त्यानंतर मात्र, या मुलाची रवानगी थेट सुधारगृहात झाली आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बेंगळुरू येथील पुट्टेनाहल्ली परिसरात आमीर नावाचा हा मुलगा राहतो. आठवीपर्यंत शाळा शिकलेल्या आमीरने शाळा सोडल्यानंतर एका गॅस एजन्सीत सिलिंडर डिलीव्हरी बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. तो ज्या एल अँड टी साऊथ सिटी अपार्टमेंट नावाच्या रहिवासी कॉलनीत वरचेवर सिलिंडर देण्यासाठी जायचा, तिथे त्याची ओळख आकृती नावाच्या 19 वर्षीय तरुणीशी झाली. ही तरुणी तिथे मोलकरीण म्हणून काम करत होती. दोघांचीही पार्श्वभूमी नेपाळ इथली असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं पर्यवसान प्रेमात झालं.

महिन्याभरापूर्वी आकृती तिच्या आई वडिलांसह आमीरच्या घरी आली आणि तिथेच राहू लागली. आकृतीच्या नातेवाईकांना हे आवडलं नाही आणि ते त्यांच्याशी नातं तोडून नेपाळला निघून गेले. काही काळ एकत्र राहिल्यानंतर सामाजिक ताणाला तोंड देण्यासाठी त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. 15 फेब्रुवारीला त्यांनी लग्न केलं आणि पती-पत्नी म्हणून राहू लागले. पण, आमीरच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तिने एका सामाजिक संस्थेला त्यांच्या या बालविवाहाची माहिती दिली. एनजीओच्या सदस्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या वयाची प्रमाणपत्र मिळवली तेव्हा आमीर हा 16 वर्षांचा असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आमीरची रवानगी थेट सुधारगृहात करण्यात आली. आमीरचं सध्या समुपदेशन सुरू असल्याचं वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या