पूर्वसूचना न देता रजा घेणाऱ्या पोलिसाला कामावरुन काढले

20
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । पीलीभीत

उत्तरप्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याने घेतलेल्या सुट्ट्या चांगल्याचं महागात पडल्या आहेत. एक, दोन नाही तर तब्बल १५ वर्ष या पोलीस कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली. १३ नोव्हेंबर २००१ रोजी पीलीभीतच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात असलेले एक कॉन्स्टेबल बलविंदर सिंह हे कोणतीही पूर्वसूचना न देता रजेवर गेले. तब्बल १५ वर्ष, २१७ दिवस ते रजेवर होते. आता ४०व्या वर्षी सिंग यांनी पुन्हा कामावर उपस्थित राहण्याचे ठरविले. मात्र, कोणतेही कारण न देता अनुपस्थित राहिल्यामुळे संतापलेल्या पोलीस विभागाने गुरुवारी सिंह यांना नोकरीवरुन काढून टाकले.

अनेक वर्षांपासून रजेवर राहिलेल्या सिंह यांना पीलीभीतचे पोलीस अधीक्षक (एसपी) देव रंजन वर्मा यांनी याबाबत विचारणा केली. गैरहजर राहण्याबाबत चौकशी केली असता सिंह काही ठोस कारणे सांगू शकले नाही. आजारी असल्याचं कोणतंही कारण सांगण्यास ते असमर्थ ठरले. सिंह हे आपल्या वैद्यकीय उपचारांचीदेखील कोणतीही कागदपत्र दाखवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कामावर अनुपस्थित असताना सिंग यांना वेतन दिले जात नव्हते.

युग्रेवाल येथील रहिवासी असलेले सिंह पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील किला पोलिस स्थानकांत सेवेत कार्यरत होते. त्यांचे वडिल धरम सिंह यांच्या मृत्यूनंतर बलविंदर यांची पोलिस विभागात नियुक्ती करण्यात आली. कामाच्या अनुपस्थितीत सिंह कोणत्याही बेकायदेशीर हालचालींत सहभागी झाले होते का, याची चौकशी करण्यासाठी पंजाबच्या गुप्तचर अधिकाऱ्याकडे विचारणा केली असल्याचे नाथानी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या