पालकांनो मुली सांभाळा! भिवंडीत वर्षभरात 160 अल्पवयीन तरुणींचे अपहरण

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाइन ,भिवंडी

भिवंडीकरांनो सावधान… वयात येणारी तुमची मुलगी काय करते, कुठे जाते, तिचे मित्र-मैत्रिणी कोण याची माहिती घ्या… तिच्यावर बंधने लादू नका, पण लक्षही राहू द्या… कारण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावत पळवून नेणाऱयांचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय झाले आहे.  गेल्या वर्षभरात दहा पंधरा नव्हे तर तब्बल 160 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. म्हणजे सरासरी दोन ते तीन दिवसांत एका मुलीचे शहरातून अपहरण होत असल्याची धक्कादायक नोंद पोलीस दप्तरी झाली असल्यामुळे पालकांची झोप उडाली आहे.

भिवंडी शहर परिसरात यंत्रमागासोबतच गोदाम व्यवसाय फोफावला आहे. त्यामुळे असंख्य मजूर कुटुंबामधील महिला, पुरुष मंडळी रोजीरोटीसाठी अहोरात्र आस्थापनात उपस्थित राहतात. हिच संधी साधून काही तरुण उपवर मुलींना हेरून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत. त्यातूनच तरुणींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना सर्रास घडत आहेत.  अपहरण झालेल्या बहुतेक मुली या अल्पवयीन तरुणी असल्याचेही समोर आले आहे.

60 मुलींचा शोध लागेना!

भिवंडीतील अपहरणाच्या वर्षभराच्या घटनांचा आढावा घेतला असता 160 अपहरणाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 70 मुलींचा व 13 मुलांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. तर 60अल्पवयीन मुली व 17 मुलं अद्यापि बेपत्ता असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अपहरण झालेल्या बहुतेक अल्पवयीन तरुणी या गरीब घरातील आहेत. घराची हालाखीची परिस्थिती असल्याने एखाद्या तरुणाच्या दिखाव्याला सहज आकर्षित होऊन घरातून पलायन करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या सर्व घटनांमागे मोठे रॅकेटही सक्रिय असल्याचा संशय आहे. गरीब मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून न्यायचे आणि मग त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्यात येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.