इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील 17 तर लेबनॉनमधील 20 जणांचा मृत्यू

इस्रायलने आज सकाळी उत्तर गाझापट्टीत निर्वासितांच्या छावण्यांवर केलेल्या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाजवळ हा हल्ला करण्यात आला, तर लेबनॉनमधील हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरू असलेला संघर्ष आणखी वाढला असून आता लेबनॉनलाही इस्रायलने लक्ष्य केले आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

गाझातील अल अहली रुग्णालयाचे संचालक डॉ. फादल नईम यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने आज गाझापट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलकडून सातत्याने निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ले होत असून गेल्या महिनाभरात त्यात आणखी वाढ झाल्याचा आरोपही डॉ. नईम यांनी केला, तर दुसरीकडे दहशतवादी हे निर्वासितांच्या छावण्यांचा अड्डय़ासारखा वापर करत असल्याने इस्रायली सैन्याकडून या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात येत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. गाझापट्टीबरोबरच इस्रायलने लेबनॉनमधील अल्मत या बैरूतच्या उत्तरेकडील गावातही हवाई हल्ला केला. यात 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान,  या भागात हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.