रत्नागिरीत 20 दिवसात इतर जिल्ह्यातून 17 हजार 651 जण दाखल

718

रत्नागिरीत 20 दिवसात इतर जिल्ह्यातून 17 हजार 651 जण दाखल झाले आहेत. त्यामध्ये पास घेऊन येणाऱ्यांची संख्या 15 हजार 207 जण आहे. तर पासशिवाय जिल्ह्यात 2454 जण आले आहेत. इतर जिल्ह्यातून परप्रांतीयांना आणि दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, मुंबईकरांना जिल्ह्यात आणायला कुणीही इच्छुक नसल्याची चर्चा आहे. तरीही जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांची आकडेवारी वाढतच आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले की, जिल्ह्यातून 4544 जण बाहेर गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 86 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बरे होऊन घरी परतले आहे. उर्वरित 68 जणांवर उपचार सुरु आहेत. या रूग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे सामंत यांनी सांगितले. डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात स्वॅब टेस्टची परवानगी मिळावी, यासाठी मागणी केली आहे. डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज येथे तपासणीचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे.

अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या मोफत देणार

कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. आयुष विभागाने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे सेवन करा, असे सांगितले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साडेचार लाख कुटूंबियांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या प्रशासनामार्फत मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. होमिओपॅथिक गोळ्या कशा घ्यायच्या याबाबत आम्ही नागरिकांना मार्गदर्शन करणार आहोत. घरातील सर्वांनीच या गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन सामंत यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या