ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 17 हजार झाडांचा बळी, वनमंत्र्यांच्या उपस्थितीतील वृक्षतोडीला हिरवा कंदील

राज्यात 18 नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित करण्याचा निर्णय एकीकडे राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्याचवेळेस यवतमाळमधील पांढरकवडा वन विभागात लाईमस्टोन उत्खननासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमणमार्गातील तब्बल 17 हजार झाडांचा बळी घेण्याच्या प्रस्तावाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मंजुरी देण्यात आली.

राज्य वन्यजीव मंडळाची 19वी बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येणार होते. पण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सुरुवातीची 10-15 मिनिटे बैठकीला बसले आणि मग सर्व सूत्रे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवून बैठकीतून निघाले. त्यानंतर वृक्षतोडीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत यवतमाळ वनवृत्तातील पांढरकवडा वन विभागात लाईन्मस्टोन उत्खननासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

वास्तविक वन्य जीव मंडळाच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या 17 व्या बैठकीत प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  समिती स्थापन करून फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

चार टक्के रक्कम संवर्धनासाठी

व्याघ्रभ्रमण मार्गात ज्या खासगी प्रकल्पांना वन्य जीव मान्यता आवश्यकता आहे त्यांच्याकडून बाधिक क्षेत्रातील प्रकल्प किमतीच्या दोन टक्के रक्कम वन्य जीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते.  पण आता खासगी प्रकल्प यंत्रणेकडून चार टक्के रक्कम घेण्याची सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली सूचना या बैठकीत मान्य करण्यात आली. ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य वन्य जीव निधी स्थापन करण्याची सूचना केली. या चार टक्के रक्कमेतील एक टक्का निधी राज्यातील जैवविविधतेसाठी वापरण्याचे आदेश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

खाणकाम टाळणे सर्वोत्तम उपाय

यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रस्तावाची फेरतपासणी केली आणि काही निष्कर्ष दिले आहेत. त्यामध्ये प्रकल्पाचे क्षेत्र व्याघ्र भ्रमणक्षेत्रात येत असल्याने या प्रकल्पाअंतर्गत वन क्षेत्रात कोणतेही खाणकाम टाळणे ही सर्वोत्तम उपाययोजना असेल असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याशिवाय प्रकल्पाचे क्षेत्र व्याघ्रभ्रमणात येत असल्याने या भागात खाणकाम सुरू करण्यापूर्वी खाणकामाचे क्षेत्र पुनर्भरण करणे आवश्यक आहे.  हिंदुस्थानी वन्य जीव संस्थेच्या अभ्यासानुसार या प्रकल्पाचा काही भाग व्याघ्रभ्रमणात येतो. वाघांचे अस्तित्व आढळून आल्याने सर्व भ्रमणमार्ग व त्या परिसरातील वाघांचे अस्तित्व असलेल्या क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची शिफारसही केली आहे.

प्रकल्पासाठी झाडांवर कुऱ्हाड

हा प्रकल्प व्याघ्रभ्रमण प्रकल्पात अजूनही या प्रकल्पासाठी तब्बल 17 हजार 919 झाडे तोडण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.