दौंड तालुक्यातील भांडगाव हद्दीत असलेल्या टेस्टी बाईट इटेबल्स कंपनीत अमोनियाची वायूगळती होऊन 17 कामगारांची प्रकृती बिघडली असून यात 3 महिला कामगार गंभीर असून गंभीर महिलांवर लोणीकाळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर 14 कामगारांना भांडगाव येथील शिवमंगल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एकूण 15 महिला, तर 2 पुरुष अशा 17 कामगारांचा समावेश आहे.
आज सकाळी कंपनीत महिला कामगार पॅकेजिंगचे काम करीत असताना पाईपच्या ऑलव्हमधून अमोनिया वायूची गळती झाली. या वेळी कामगारांना डोके दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे, घशात खवखव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे असा त्रास सुरू झाला. या वेळी गंभीर असलेल्या देवशाला मोहन शिंदे, अलका संभाजी ढमरे, सपना शितोळे या 3 महिला कामगारांना लोणीकाळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. तर माधुरी निंबाळकर, भाग्यश्री मोरे, जयश्री शितोळे, हमशेरा सय्यद, रशीदन बानू, संगीता वाघ, रोहिणी यादव, रुपाली राऊत, योगीता भंडलकर, प्राजक्ता राऊत, नेहा फरगडे, मंगल लडगड, कैलास बोत्रे, विशाल हंडाळ अशा 14 जणांवर भांडगाव येथील शिवमंगल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.