लष्कर भरतीचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका विकणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड

88

सामना ऑनलाईन, ठाणे

नागपुरात आज लष्कर भरतीचा पेपर फुटला.  गोव्यात आणि पुण्यातही हा पेपर प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना खुलेआम विकण्यात आल्याची खळबळजक बाब उघडकीस आली आहे. प्रश्नपत्रिका उमदेवारांना विकणाऱया रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला असून १८ एजंटांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यात लष्करातील दोघा निवृत्त अधिकाऱयांचादेखील समावेश आहे. हे रॅकेट देशव्यापी असल्याचा दाट संशय असून जे लष्कर देशाच्या संरक्षणासाठी लढते त्याच्या भरतीतही भ्रष्टाचार झाल्याने अवघा हिंदुस्थान हादरला आहे. नागपूर, पुणे व गोव्यात छापे टाकून ठाणे क्राइम ब्रँचने हे रॅकेट उद्ध्वस्त केले असून ३५० उमेदवारांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात काही बडय़ा अधिकाऱयांचा समावेश असल्याची दाट शक्यता आहे.

मध्यरात्री मुसक्या आवळल्या

आर्मी रिक्रूटमेंट बोर्डामार्फत जनरल डय़ुटी, टेक्निकल, क्लार्क व ट्रेडस्समन या चार विभागांसाठी पुणे, नागपूर व गोवा या झोनमध्ये आज लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आर्मी रिक्रूटमेंटच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी अनेक खासगी संस्था क्लासेस चालवितात. ठाणे जिह्यातील अशाच एका क्लासचालकाने ठाणे पोलिसांना परीक्षेची प्रश्नपत्रिकाच उमेदवारांना काही एजंट विकत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच या माहितीच्या आधारे रातोरात चार टीम नागपूर, गोवा तसेच पुण्यात पाठवल्या. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुण्यातील फुरसुंगी, नागपूरमधील निर्मल नगर व गोव्यातील रागतूर येथे छापे टाकले. काही ठिकाणी हॉलमध्ये तर काही भागांत अज्ञातस्थळी एजंटांनी उमेदवारांना बोलावले होते. प्रत्येकाकडून चार ते पाच लाख रुपये उकळून उमेदवारांना रात्री एक वाजता  प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.

गाडय़ा, मोबाईल्स, प्रश्नपत्रिका जप्त

पोलिसांनी पुण्यातून नऊ, नागपुरात सहा तर गोव्यात  तीन  एजंटांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गाडय़ा, मोबाईल्स तसेच प्रश्नपत्रिका जप्त केल्या असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. जनरल डय़ुटी, टेक्निकल, क्लार्क व टेडस्मन या चारही विभागांच्या प्रश्नपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या. रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे छापासत्र सुरू होते. त्यात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी प्रश्नपत्रिका विकत घेणाऱया ३५० उमदेवारांना ताब्यात घेतले असून  त्यात पुण्यातील ७९, नागपुरातील २२२ व गोव्यातील ४९ उमेदवारांचा समावेश आहे. या सर्वांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यांची ओळखपत्रे तसेच अन्य कागदपत्रेही ताब्यात घेतली असून सर्वांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका विकत घेण्यासाठी एवढे चार-पाच लाख रुपये कुठून आणले याचाही शोध पोलीस घेणार आहेत.

बॉसच्या व्हॉटस्ऍपवर प्रश्नपत्रिका

आर्मी रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सौदा तब्बल पाच लाख रुपयांना करून ती प्रश्नपत्रिका साडेतीनशे उमेदवारांना देण्यात आली. त्यात तब्बल १७ कोटी  रुपयांची कमाई करण्यात आली. पेपरफुटीची ही मोडस ऑपरेंडी भल्याभल्यांना थक्क करणारी असल्याचे दिसून आले आहे. नागपूर, पुणे व गोव्यातील एजंटांच्या बॉसकडे आधी या प्रश्नपत्रिका व्हॉटस्ऍपवर पाठविण्यात आल्या. त्यानंतर त्याचे प्रिंट काढून नंतर त्या झेरॉक्स प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना बॉसच्या साथीदारांनी विकल्या.

८० पोलीस कर्मचारी, अधिकाऱयांची कामगिरी

पेपरफुटीचा भंडाफोड करण्यासाठी पोलिसांच्या चार टीम रात्रभर काम करीत होत्या. त्याशिवाय 80 कर्मचारी म्होरक्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, भरत शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे, नितीन ठाकूर, शीतल राऊत, संजय साबळे, मदन बल्लाळ, हेमंत शिंदे  यांच्या पथकाने केली.

क्लासेस चालविणारे,

अधिकारी यांचे साटेलोटे

आर्मी रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षा अनेक तरुण देत असतात. त्यांना लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे वर्ग महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे यांसारख्या महानगरांमध्ये चालतात. त्यांचे चालक तसेच लष्करातील अधिकारी व एजंट यांचे साटेलोटे असून पोलीस या क्लासेस चालकांचीदेखील चौकशी करणार आहेत.

मास्टरमाइंड कोण?

लष्कर भरतीची लेखी परीक्षा आर्मी रिक्रूटमेंट बोर्ड घेते. उमेदवारांना पर्यायी प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका तयार करणारे, क्लासेस चालविणारे तसेच एजंट यांची मोठी चेन असण्याची दाट शक्यता असून पेपरफुटीमागे मास्टरमाइंड नेमका कुणाचा  याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. एजंटांच्या बॉसना व्हॉटस्ऍपवर कुणी प्रश्नपत्रिका पाठवली, त्याची प्रिंट कुठे काढली याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.

रहिवासी प्रमाणपत्रही बोगस

अनेकदा झोनच्या बाहेरील तरुणही लष्कर भरतीची परीक्षा देऊन आपले नशीब अजमावत असतात. त्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र दिल्याचादेखील भंडाफोड आज ठाणे पोलिसांनी केला. ही प्रमाणपत्रे एजंटांनीच दिली असून त्यात काही सरकारी अधिकारीदेखील अडकण्याची दाट शक्यता आहे.

 अखेर परीक्षा रद्द

पोलिसांनी छाप्यामध्ये जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका रिक्रूटमेंट अधिकाऱयांना पाठविल्या. रविवारी सकाळी ९ वाजता परीक्षा होती. उमेदवारांना दिलेल्या प्रश्नपत्रिका व पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका या सेम टू सेम आढळल्याने अखेर आजची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणे जिह्यातील उमेदवारांनीही लष्कर भरतीची परीक्षा दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या