सैन्यभरतीच्या पेपरफुटीची पाळंमुळं संरक्षणमंत्र्यांच्या गोव्यापर्यंत पोहोचली

32

सामना ऑनलाईन, ठाणे

रविवारचा दिवस उजाडला तोच एका धक्कादायक बातमीने. सैन्यभरतीसाठी रविवारी सकाळी ९ वाजता परीक्षा होती, या परीक्षेचा पेपर फुटल्याचं उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी राज्यातून तसेच गोव्यामधून एकूण १८ जणांना अटक केली आहे तर ३५० विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं आहे. या पेपरफुटीमध्ये सैन्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

पेपर फोडणाऱ्यांचं हे एक मोठं रॅकेट असल्याचं मानलं जात आहे. पुण्याजवळ हडपसरमध्ये ७० परीक्षार्थींकडून प्रत्येकी ३ लाख रूपये उकळत त्यांना व्हॉटसअपवरून पेपर पाठवण्यात आला. हडपसरमधील भेकराईनगर भागामध्ये विद्यार्थ्यांना फोडलेला पेपर देणाऱ्या संतोष शिंदे आणि धनाजी जाधव यांना अटक करण्यात आलीय.

हा रॅकेटची माहिती सगळ्यात आधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. ठाणे पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा कारवाईला सुरूवात केली. रविवारी सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती असं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातून पोलिसांनी ज्या अठरा जणांना अटक करण्यात आली आहे ते सैन्यभरतीसाठीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉज किंवा हॉटेलमध्ये एकत्र करून तिथे त्यांना फोडलेले पेपर लिहायला देत होते. ठाणे पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या