मालमत्ता कर माफ केल्यामुळे १८ लाख कुटुंबांना होणार फायदा

57

सामना प्रतिनिधी । मुंबई

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून ६० टक्के सवलत देण्याच्या महापालिकेच्या ठरावामुळे तब्बल १८ लाख मुंबईकरांना फायदा होणार आहे. शिवसेनेने केलेल्या वचनपूर्तीमुळे लाखो मुंबईकरांच्या डोक्यावरचे मालमत्ता कराचे ओझे उतरणार आहे. त्याकरिता पालिका ५०० कोटींच्या महसुलावर पाणी सोडणार आहे.
शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी गुरुवारी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सभागृहात ठरावाची सूचना मांडली. या सूचनेवरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची राजकीय कोंडी करीत महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही सूचना मंजूर केली. सभागृहाने हा ठराव मंजूर केल्यामुळे आता वचनपूर्तीच्या दिशेने शिवसेनेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

प्रस्ताव जाणार थेट नगरविकास विभागाकडे
शिवसेनेने दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची पहिली पायरी म्हणून गुरुवारी सभागृहात ठराव मांडण्यात आला. महापालिका सभागृहात गुरुवारी मंजूर झालेला प्रस्ताव आयुक्तांमार्फत थेट नगरविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे. नगरविकास विभागाच्या परवानगीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचा हा निर्णय आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे. या निर्णयासाठी शिवसेना पाठपुरावा करणार आहे.
– यशवंत जाधव, सभागृह नेते

१८ लाख मुंबईकरांना होणार फायदा
– मुंबईत एकूण मालमत्ता – २८ लाख
– ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे – १५ लाख
– मिळणारे उत्पन्न – ३४० कोटी रु.
– ५०० ते ७०० चौ. फुटांपर्यंतची घरे – ३ लाख
– या घरांपासून मिळणारे उत्पन्न – २५० कोटी

४० टक्केच कर भरावा लागणार
५०० ते ७०० चौरस फुटांच्या घरांना करात सवलत देण्याचे आश्वासन वचननाम्यात शिवसेनेने दिले होते. त्यानुसार ६० टक्के सवलत देण्याचा ठराव सभागृहाने गुरुवारी केला. त्यामुळे अशा सुमारे तीन लाख मालमत्ताधारकांना फक्त ४० टक्केच मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या