
18व्या रमेश देसाई मेमोरियल ‘16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत’ मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या समर्थ सहिता व अर्णव पापरकर यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. तर, मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी. व तेलंगणाच्या ऋषिता बसिरेड्डी यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या वतीने व डी. वाय. पाटील पुरस्कृत या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यफेरी मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखत अंतिम फेरी गाठली. पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्या बिगर मानांकित अर्णव पापरकरने आपल्या खेळात सातत्य राखत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर कर्नाटकच्या दुसऱया मानांकित आराध्या क्षितिजचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित समर्थ सहिताने दिल्लीच्या प्रणील शर्माचा 6-4, 6-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात एकेरीत कर्नाटकच्या बिगर मानांकित साई जान्वी टी. ने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित नैनिका रेड्डी बेंद्रमचा 6-3, 6-4 असा, तर तेलंगणाच्या नवव्या मानांकित ऋषिता बसिरेड्डीने महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदेचा 6-1, 7-6(2) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव या अव्वल मानांकित जोडीने ओडिशाच्या सोहिनी मोहंती व कर्नाटकच्या हरिशिनी एन. यांचा 6-4, 6-4 असा, तर महाराष्ट्राच्या नानिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुसऱया मानांकित जोडीने कर्नाटकच्या अरझान खोराकीवाला व दिल्लीच्या यशिका शोकीनचा 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात आराध्या क्षितीज व श्रीनिकेत कन्नन या कर्नाटकच्या बिगर मानांकित जोडीने गुजरातच्या कबीर चोठानी व महाराष्ट्राच्या समर्थ साहित्य या अव्वल मानांकित जोडीला 7-5, 6-2 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या प्रणील शर्मा व हरियाणाच्या आदित्य मोर यांनी तेलंगणाच्या धीरज रेड्डी व्ही. व राहुल लोकेश यांचा 6-4, 1-6, 10-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.