दगडफेकीमुळे सीआरपीएफच्या गाडीला अपघात, १९ जवान जखमी

29

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरमधील श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीनंतर त्या गाडीला अपघात झाला असून गाडीतील १९ जवान जखमी झाले आहेत. जवानांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींना गंभीर दुखापत झालेली आहे. दरम्यान सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात फुटीरवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी पहाटे सीआरपीएफचे जवान एका टेम्पोतून श्रीनगरहून दुसऱ्या शहरात जात होते. पहाटे साडे पाचच्या सुमारास शाम लाल पेट्रोल पंपाजवळ त्यांची गाडी येताच त्यांच्या गाडीवर काही फुटीरवाद्यांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमुळे चालकांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ती गाडी रस्त्यावरून घसरली व एका बाजूला कलंडली. या दगडफेकीमुळे व अपघातामुळे गाडीतील १९ जवान जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

मे महिन्याच्या शोपियां येथे फुटीरवाद्यांनी शाळकरी बसला निशाणा बनवले होते. त्यात काही विद्यार्थी जखमी झाले होते, तर काही दिवसांपूर्वी बडगाम येथे फुटीरवाद्यांनी तामिळनाडूतून आलेल्या पर्यटकांच्या बसवर तुफान दगडफेक केली. यात डोक्याला दगड लागल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या