जालन्यातील जोगलादेवी बंधाऱ्याचे 19 दरवाजे उघडले; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

जायकवाडी धरण पूर्ण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. नदीवरील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु होताच नदीवरील सर्व बंधाऱ्याचे दरवाजे टप्याटप्याने उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे असलेल्या बंधाऱ्याचे 20 पैकी 19 दरवाजे पूर्णपणे उघडल्याने बंधाऱ्यातून शुक्रवारी 94 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु होताच जोगलादेवी येथील बंधाऱ्याचे गुरुवारी रात्री 8 वाजता 3 दरवाजे उघडले. नंतर रात्री 12 वाजता पुन्हा 3 दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी पहाटे 5 वाजता पुन्हा 7 दरवाजे उघडले. नंतर दुपारी 3 वाजता 6 असे एकून 19 दरवाजे उघडण्यात आले आहेत. घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. गोदावरीची पाण्याची पातळी पात्राच्या आतच असून प्रशासनासह ग्रामपंचायत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या