म्यानमारचे 19 पोलीस गुपचूप मिझोराममध्ये घुसले

म्यानमारमध्ये राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवल्यानंतर या देशाची सगळी सूत्रे तिथल्या लष्कराने हाती घेतली आहेत. लष्कराने आंग सान स्यू की यांना देखील अटक केली आहे. त्यामुळे या लष्करी राजवटीविरोधात तसेच आंग सान स्यू की यांच्या सुटकेसाठी हजारो नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी लष्कराकडून गोळीबार करण्यात येत आहे. बुधवारी या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला होता. लष्कराच्या या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेप्रमाणेच तिथले काही अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही उभे ठाकले आहेत. यातले 19 पोलीस कर्मचारी गुपचूपरित्या मिझोराममध्ये घुसले आहेत.

म्यानमार हा हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र आहे. 1 फेब्रुवारीला म्यानमारमध्ये सरकार उलथवल्यानंतर लष्कराने या देशावर ताबा मिळवला आहे. तेव्हापासून आतापर्यंत आंदोलनकर्ते व लष्करामध्ये झालेल्या हिंसाचारात 58 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या या राजवटीविरोधात आता सामान्य जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारीही उतरले आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे तर काही पोलीस हे हिंदुस्थानात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातील 19 पोलीस हे मिझोराममधील चंपाई व सरचिप या जिल्ह्यात घुसले आहेत. हिंदुस्थानात म्यानमारमधून घुसणाऱ्या पोलिसांची संख्या येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आंदोलनानंतर म्यानमार पोलीस हिंदुस्थानात घुसण्याची ही पहिलीच घटना आहे. ‘जे पोलीस मिझोराममध्ये घुसले आहेत ते कनिष्ठ पोलीस कर्मचारी आहेत. लष्कराकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना जे आदेश मिळाले होते ते आदेश हे पोलीस कर्मचारी पाळू शकत नव्हते, त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने ते इथे पळून आले आहेत. घुसखोरी करून हिंदुस्थानी हद्दीत येत असताना त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते ‘ असे मिझोराममधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या