मुंबईत महिला असुरक्षित, चार महिन्यांत महिला अत्याचाराच्या 1977 घटना

महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असा मुंबईचा नावलौकीक असताना त्याला छेद देणारी आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत महिला अत्याचार आणि हत्येच्या घटनांचे प्रमाण भीतीदायक असून गेल्या चार महिन्यांत अशा तब्बल 1977 घटना घडल्याची माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईत 93 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत महिला अत्याचाराच्या 1977 घटना घडल्या. यात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, हुंडय़ासाठी छळ, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांचा समावेश आहे. यापैकी 1470 गुह्यांची उकल करण्यात आली. हा डिटेक्शन रेट 74 टक्के इतका आहे. याच चार महिन्यांच्या कालावधीत 2022 मध्ये हा आकडा 65 टक्के इतका होता.

महिला अत्याचाराच्या घटनांचा तपास फास्ट ट्रकवर करून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश संजय पांडे यांनी महासंचालक असताना दिले होते. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनीही महिला सुरक्षेवर भर देत निर्भया पथक, निर्भया पेटी, सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढवणे, निर्जनस्थळी सीसीटीव्ही पॅमेरे, एकटय़ा महिलेला सुरक्षित घरी सोडण्याची व्यवस्था, महिला सुरक्षा सेल सुरू केले होते. आताही विद्यमान आयुक्त विवेक फणसळकर महिला सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस तत्पर आहेत. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यावर्षी एकूण गुन्हे कमी झालेत तसेच डिटेक्शन रेटही वाढला आहे, असे मुंबई पोलिसांचे प्रवत्ते उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले.

बलात्काराच्या 325 घटना

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईत बलात्काराच्या 325 घटना घडल्या. अपहरणाचे 407 तर हुंडय़ासाठी छळाचे 228 गुन्हे दाखल झाले. यातील बलात्काराच्या 286 गुह्यांची उकल झाली तर अपहरणाच्या 332 आणि हुंडय़ासाठी छळाच्या 95 प्रकरणांचा यशस्वी तपास केला गेला आहे.

गेल्या वर्षीच्या 1341 गुन्ह्यांची उकल नाही

गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात महिला अत्याचाराच्या 2078 घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणी तपासाचा वेग फारच कमी असून आतापर्यंत 1341 गुह्यांचीच उकल होऊ शकली आहे.
– मुंबईत महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी 16 घटना घडत असून महिन्याला हे प्रमाण 480 इतके आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.