1983 चे क्रिकेट जगज्जेते आंदोलक कुस्तीपटूंच्या पाठीशी; गंगेत पदके विसर्जित न करण्याचे आवाहन

लैंगिक शोषणप्रकरणी न्यायासाठी गेले महिनाभर आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असले तरी देशातून आंदोलकांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. आता हिंदुस्थानला 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडूंनी या आंदोलक कुस्तीपटूंना आपला पाठिंबा दिला आहे. क्रिकेट जगज्जेत्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलक कुस्तीपटूंमध्ये नवचैतन्य संचारले असून केंद्र सरकारवरही दबाव वाढला आहे.

1983 च्या क्रिकेट जगज्जेत्यांनी कुस्तीपटूंना आपला पाठिंबा दर्शविताना एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी  कुस्तीपटूंच्या तक्रारींवर केंद्र सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी तर केलीच आहे, पण त्याबरोबर त्यांनी कुस्तीपटूंना आपल्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गौरवाचे चिन्ह असलेली पदके गंगेत विसर्जन करू नका, असे आवाहनही केले आहे.

कुस्तीपटूंसाठी आवाज उठवणाऱ्या या क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर, मदन लाल, कपिल देव, दिलीप वेंगसरकर आदींचा समावेश आहे. पदकविजेत्या कुस्तीपटूंसोबत पोलिसांनी ज्या पद्धतीने गैरवर्तन केले आहे ते अस्वस्थ करणारे आहे. अत्यंत कष्टाने जिंकलेली पदके गंगेत विसर्जित करण्याच्या निर्णयापर्यंत यावे लागणे हे वेदनादायी आहे. कुस्तीपटूंनी देशासाठी पदके जिंकून देशाची मान उंचावली आहे. त्यांनी घाईगडबडीत भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. त्यांच्या तक्रारी नक्कीच ऐकल्या जातील आणि लवकरात लवकर त्यांना समाधानही मिळेल, अशी आशा आहे. सर्वांनी कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी आपल्या निवेदनात केले आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. या संघात सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, कृष्णम्माचारी श्रीकांत, सय्यद किरमाणी, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांचा समावेश होता.