मनुष्य गौरव दिन का साजरा करतात?

human being

सामना ऑनलाईन । मुंबई

आज व्यक्तीला पद-पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या जोरावरच समाजात स्थान मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेकदा लाचारी दिसते किंवा निराशा. मात्र या सगळ्यापेक्षाही माणसाला स्वत:चं असं अस्तित्व आणि प्रतिष्ठा आहे ती ‘मनुष्य’ असल्याची. सर्व सृष्टीचा चालक भगवंत माझ्यात आहे, या श्रीमद्भगवद्गीतेच्या विचारांच्या आधारावर कृतिशील तत्त्वचिंतक व स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी माणसाला त्याची खरी ओळख दिली आणि समाज परिवर्तन घडवून आणले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्वाध्याय परिवार १९ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करतो.

तत्त्वचिंतक आणि स्वाध्याय परिवार प्रणेत पांडुरंगशास्त्री आठवले
तत्त्वचिंतक आणि स्वाध्याय परिवार प्रणेत पांडुरंगशास्त्री आठवले

समाजात लूटमार-भ्रष्टाचार-आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. नैराश्यापायी व्यसनांच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाणही वाढले आहे. समस्या सोडवण्यासाठी अशिक्षितच नाही तर सुशिक्षित वर्गही अंधश्रद्धा आणि बाबा बुवा यांच्या मागे धावताना दिसतो. अशी स्थिती का आली? गौरवशाली परंपरा लाभलेल्या या देशातील माणूस आत्मगौरवरहित का? माणूस विकला का जातो? माणूस, मग तो कितीही मोठा का असेना, आज विकत घेऊ शकणारी वस्तू बनला आहे (purchasable commodity). आज दुर्दैवाने समाजात बाह्य आभूषणांशिवाय गौरवच मिळत नाही. ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे त्यालाच किंमत मिळते. पण ही सर्व आभूषणे नसतील तर माणसाला किंमतच नाही? समाजातील ९०% पेक्षा जास्त लोकांकडे विद्या, वित्त, सत्ता, कीर्ती, यातील काहीच नाही व ते नसल्यामुळे जर त्यांना किंमतच मिळणार नसेल, गौरव प्राप्त होणार नसेल तर सुधारलेपणाला काय अर्थ आहे? ‘Identity Crisis’स्वत:ची ओळख हे या समस्यांच्या मुळाशी असल्याचं दादांनी ओळखलं. म्हणून वैदिक विचारांच्या आधारावर मी माणूस आहे ही पहिली ओळख पांडुरंगशास्त्री यांनी करून दिली. मी आहे तर सारं काही हे याविचाराने माणसाचं नैराश्य झटकलं पण त्याच्यात उन्मत्तता येऊ नये म्हणून भगवंत तुझ्या हृदयात आहे, हा गीतेचा विचार समजावला. आकाशात-मंदिरातच देव मानणाऱ्या जगात माणसाच्या आतला देव शोधून देणारा ऋषी आणि संतांचा क्रांतीकारी विचार त्यांनी समाजात स्थिर केला.

त्यांच्या विचारांमुळे हजारों लोकांची व्यसने सुटली, गावांतील भांडणतंटे मिटले, गावांमध्ये स्वच्छता झाली. भक्तीफेरी सारख्या प्रयोगातून शहरातील सुशिक्षित वर्ग खेड्यापाड्यांवर जाऊन लोकांना दैवीसंबंधातून भेटू लागला, विचार देऊ लागला. त्यामुळे जातीभेद नष्ट झाले, अंधश्रद्धा मिटल्या. खेडापाड्यातले लोक शिक्षणासोबत संस्कार घेऊ लागले. अनेक गावांनी श्रमभक्ती करून कुवारिचार्ज, शोषखड्डे, स्वच्छतागृह उभारली. वृक्षमंदिर, माधववृंद प्रयोगातून शहर आणि गावांमध्ये लाखो वृक्ष लावले आणि वाढवले.

दादांनी ठामपणे सांगितले की, तुझ्याकडे या प्रस्थापित शक्तींपैकी काहीही नसेल कदाचित, पण तुझ्याजवळ तुझा भगवंत आहे, तो तुझे शरीर चालवतोय. चराचर सृष्टी चालवणारा भगवंत माणसात येऊन राहिला आहे हाच माणसाचा सर्वात मोठा गौरव आहे. मनुष्याचा हा गौरव उभा करण्यासाठी दादांनी अवघे आयुष्य वेचले. सर्वसामान्य माणसाला अस्मिता दिली, आत्मगौरव दिला, माणसाचा कणा मजबूत केला. वैश्विक स्वाध्याय परिवाराच्या रूपाने एक वैकल्पिक समाजच (Alternative society) जणू निर्माण करून दाखवला.

पांडुरंगशास्त्री यांच्या या कार्यासाठी समाजाने व विश्वाने मॅगसेसे पुरस्कार, टेंपलटन पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, पद्मविभूषण यासारख्या अनेकानेक पुरस्कारांनी पांडुरंगशास्त्रींच्या कार्याची दखल घेतली.

पांडुरंगशास्त्री आठवले यांना वैश्विकस्तरावरील सन्मानाचा टेम्पल्टन पुरस्कार मिळाला तेव्हाचा क्षण...
पांडुरंगशास्त्री आठवले यांना वैश्विकस्तरावरील सन्मानाचा टेम्पल्टन पुरस्कार मिळाला तेव्हाचा क्षण…
आपली प्रतिक्रिया द्या