हिंदुस्थानी तटरक्षक दिन ; आम्ही संरक्षण करतो..!

>> आसावरी जोशी 

आज हिंदुस्थानी तटरक्षक दिन . आपले आरमार हा प्रत्येक हिंदुस्थानीच्या अभिमानाचा विषय आहे. हिंदुस्थानी तटरक्षक दल हे असेच आपल्याला अभिमान वाटावा असेच सागरी सुरक्षा दल आहे. हे हिंदुस्थानी आरमाराशी समांतर असले तरी त्याची रचना, कर्तव्ये, जबाबदाऱ्या सारेच वेगळे असते. आजच्या तटरक्षक दिनानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी रंजक गोष्टी…

 

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही हिंदुस्थानची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे हिंदुस्थानी तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी हिंदुस्थानी  तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात हिंदुस्थानी  तटरक्षक दिन साजरा केला जातो.

सागरी तटरक्षक दल म्हणजेच  सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेलं लष्करी दल. या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळले तर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करणे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहेत. ही चार प्रादेशिक मुख्यालये हिंदुस्थानच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर अकरा जिल्हा तटरक्षक दल व सहा तटरक्षक स्थानकांमार्फत काम करतात. हिंदुस्थानी  सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य  ‘वयम् रक्षमः’असे आहे. याचाच अर्थ “आम्ही संरक्षण करतो” असा आहे.

जाणून घ्या तटरक्षक दलाची कर्तव्ये :

समुद्रावरील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे.

किनाऱ्यापासून सागरी सीमेपर्यंत गस्त घालणे.

स्वकीय मच्छीमारांना संरक्षण देणे आणि परकीय मच्छीमारांचा अटकाव करणे.

संशयास्पद जहाजे तपासणे तसेच दुर्घटनाग्रस्त जहाजांना मदत करून लोकांचे प्राण आणि संपत्तीचा बचाव करणे.

किनाऱ्यावरील जहाजातून तेलगळती होत असल्यास समुद्रातील मासे आणि इतर जलचरांना वाचविणे.

समुद्रात विमान दुर्घटना झाल्यास मदत करणे.

प्रदूषणामुळे धोक्यात आलेल्या वनस्पतींचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखणे.

चोरट्या आयात-निर्यातीवर देखरेख ठेवून सीमाशुल्क आकारणे.

सागरी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यावर गुन्हा दाखल करणे इ.

आपला  सागरी किनारा सुमारे 7,517 किमी. आहे. या किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलावर आहे. यासाठी शेजारील देशांशी असलेल्या संबंधांवर तटरक्षक दलाची करडी नजर असते. भाभा अणुसंशोधन केंद्र, गुजरातमधील आण्विक भट्टी, लहान-मोठी बंदरे, खनिज पदार्थ, ॲल्युमिनियम भट्ट्या, नाविक तळ, विमानतळ इ. संवेदनक्षम स्थळे किनारपट्टीवर आहेत. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर तर आहेच. त्याचप्रमाणे सागरी वादळे किंवा त्सुनामी लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्या संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याचीही महत्वपूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.

हिंदुस्थानचा  सागरी किनारा सु. ७,५१७ किमी. आहे. यामध्ये पूर्व आणि पश्चिम किनारा, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे आणि अन्य लहानसहान अनेक बेटे यांचा अंतर्भाव होतो. या किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलावर असून पश्चिमेस व उत्तरेस पाकिस्तानचा किनारा पूर्वेस बांगला देश आणि म्यानमार या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांवर तटरक्षक दलाची करडी नजर असते. लहानसहान खाड्यांमधून छोट्या बोटी, शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ, अतिरेकी वगैरेंची अवैध रित्या ने-आण करतात. त्यांच्यावर तटरक्षक दलाला लक्ष ठेवावे लागते तसेच भाभा अणुसंशोधन केंद्र, गुजरातमधील आण्विक भट्टी, लहान-मोठी बंदरे, खनिज पदार्थ, ॲल्युमिनियम भट्ट्या , नाविक तळ, विमानतळ इ. संवेदनक्षम स्थळे किनारपट्टीवर आहेत. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर असून शिवाय सामुद्रिक वादळे व त्सुनामी लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्या संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.

 प्रत्येक देशाच्या सागरी किनारपट्टीला लागून प्रादेशिक जलाशय (टेरिटोरिअल वॉटर्स) हा भाग असतो. प्रादेशिक जलाशयाची मर्यादा किनाऱ्यापासून सु. ४४ किमी. पर्यंत असलेल्या जलप्रदेशावर असून किनाऱ्यापासून ३२० किमी. अंतरापर्यंतचा जलप्रदेश हा त्या त्या देशाचा आर्थिक क्षेत्रविभाग मानला जातो. या क्षेत्रविभागात असलेल्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीचा शोध लावण्याचा, उपभोग घेण्याचा व संवर्धन करण्याचा हक्क त्या देशाला असतो. या सर्व प्रकारच्या कार्यासाठी सागरी तटरक्षक दल जबाबदार असते. या दलाचा नौसेनेशी घनिष्ठ संबंध असतो. या सीमेत परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. या सागरी प्रदेशावर सुरक्षा, स्वच्छता, वसाहत करणे इ. कारणास्तव तटरक्षक दलाचा हक्क असतो. ह्या दलात लहान-मोठ्या बोटी, जहाजे, किनारपट्टीवर गस्त व टेहळणी करणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स असतात. याशिवाय तोफनौका, नष्टशेषशोधक (सॅल्व्हर), अग्निशामक आणि प्रदूषणनियंत्रक इ. प्रकारच्या नौका या दलाकडे असतात. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न झाले आणि केंद्र शासनाने त्यासाठी कालबद्घ कार्यक्रम आखला. सध्या  तटरक्षक दलाकडे सु. ९३ नौका आणि ४६ विमाने आहेत

खनिज तेलाचे किंवा नैसर्गिक वायूचे साठे जिथे आहेत, त्यांची जबाबदारी खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग (ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन -ओएनजीसी) घेतो. त्या ‘प्लॅटफॉर्म’ना रसद पुरविणे, कामगारांची ने-आण करणे, दुरुस्ती इ. कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ती तटरक्षक दलाची जबाबदारी नाही.

साहसी आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या राष्ट्रप्रेमी तरुणांना तटरक्षक दलात करिअर करण्याची उत्तम संधी आहे. १९७८ साली हिंदुस्थानी तटरक्षक दल (कोस्ट गार्ड)ची स्थापना चौथे सशस्त्र दल म्हणून करण्यात आली. तटरक्षक दलाची उद्दिष्टं पुढीलप्रमाणे आहेत.

तटरक्षक दलात तरुणांना अधिकारी, यांत्रिक किंवा नाविक म्हणून जाता येतं.

यांत्रिक टेक्निकल (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स)

वयोमर्यादा : वय १८ ते २२ वर्षे.

शिक्षण : दहावी उत्तीर्ण व मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किमान ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक क्षमता : उंची- १५७ सें.मी. वजन उंचीच्या प्रमाणात.

दृष्टी- ६/६, ६/९ (चष्म्याशिवाय).

वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

निवडप्रक्रिया : ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा वैकल्पिक स्वरूपाची असेल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावलं जातं. वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम निवड जाहीर केली जाते. यांत्रिकांना प्रधान यांत्रिक, सहाय्यक इंजिनीअर, उत्तम सहाय्यक इंजिनीअर, प्रधान सहाय्यक इंजिनीअर अशी बढती मिळू शकते.

हिंदुस्थानच्या  सागरी आणि महासागरी सुरक्षेमध्ये तटरक्षक दलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. २०२१ मध्ये तटरक्षक दलाने २४६ मच्छीमारांचे प्राण वाचवले. तटरक्षक दलाने केलेल्या कारवाई करता त्यांना २६ जानेवारीला ‘प्रेसिडेंट तटरक्षक मेडल’, ‘तटरक्षक मेडल शूरता’ने सन्मानित करण्यात आले. तसेच यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतल्या संचलनात १६० जणांच्या तटरक्षक दलाच्या तुकडीचे नेतृत्व सांगलीची कन्या अपूर्वा गौतम होरे यांनी केले. गेल्या तीन वर्षांपासून त्या पोरबंदर येथील नौदलाच्या विभागात ‘असिस्टंट कमांडंट’ पदावर कार्यरत आहेत. ‘युपीएससी’ परीक्षेत त्या राज्यात पहिल्या, तर देशात सहाव्या आल्या होत्या. ‘नेव्हल अकॅडमी’तल्या ‘ट्रेनिंग’मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलही त्यांना गौरविण्यातही आले होते. तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार, ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिंदुस्थानी  लष्कर, वायुदल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे. गुजरातमधील सुरक्षा व्यवस्थेला, विशेषत: पाकिस्तानला लागून असलेल्या सागरी सीमेवरील सुरक्षेला शासनाने प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यामुळेच कच्छमध्ये लष्कर, वायुदल, सीमा सुरक्षा दल आणि तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या मच्छीमारांकडून भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये सातत्याने होणार्‍या घुसखोरीबाबत चिंता आहे.

 तटरक्षक दलाच्या १३० युनिटकडे सध्या ६० बोटी, १८ ‘हॉव्हरक्राफ्ट’, ५२ छोट्या ‘इंटरसेप्ट’ बोटी, ३९ ‘डॉनियर’ टेहळणी विमाने, १९ ‘चेतक’ हेलिकॉप्टर्स व चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्स आहेत.

 तटरक्षक दलाच्या स्थापनेची कारणे, रचना

१९६० नंतर हिंदुस्थानी  अर्थव्यवस्थेस सोने, चांदी, विद्युत उपकरणे इत्यादींच्या आखातातून समुद्रमार्गे भारताच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत करण्यात येणार्‍या मोठ्या प्रमाणातील तस्करीने त्रस्त केले होते. हिंदुस्थानी नौदलाने सरकारला विनंती केली की, समुद्री कायदा व सुव्यवस्थेकरिता वाहिलेली एखादी स्वतंत्र संस्था निर्माण करावी. १९७० नंतर तीन महत्त्वाच्या घटकांनी, ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’ स्थापन करण्याबाबतचे ’युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ द सीज’चे निर्देश, तस्करी, मुंबईच्या किनार्‍यानजीकचे तेल शोध आणि उत्पादन आणि अवैध मासेमारी (पोचिंग)मुळे  तटरक्षक दलाची स्थापना आवश्यक झाली. तटरक्षक दलाचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. प्रत्यक्ष कार्य पाच प्रादेशिक मुख्यालयांतून होत असते. ती गांधीनगर, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि पोर्ट ब्लेअर येथे आहेत. या प्रादेशिक मुख्यालयाअंतर्गत १२ जिल्हा मुख्यालये आहेत, जी हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर वसलेली आहेत.  तटरक्षक दलाच्या जबाबदार्‍या, सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारीसुरक्षा, समुद्रीसुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण, युद्धकाळात राष्ट्रीय संरक्षण या आहेत. अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, मादक पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी जहाज किंवा नौका थांबवून, कार्यवाही केली जाते.

हिंदुस्थानी  तटरक्षक दल परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज आहे का?

किनारी राज्ये व इतर सुरक्षा संस्थांना साहाय्य करण्यासाठी  तटरक्षक दलाने ४२ तटरक्षक दल स्थानके निर्माण केलेली आहेत.नऊ किनारी राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्यापाशी आता किनारी रडार साखळी आहे. Automatic Identification System आहेत. Night Vision Devices आहेत. ४६ रडार स्थानकांच्या या साखळीत, ३६ स्थानके मुख्यभूमीच्या किनार्‍यावर आहेत. दहा द्वीपप्रदेशांच्या किनार्‍यावर आहेत. लक्षद्वीप गटातील किनार्‍यावर सहा आणि अंदमान गटातील किनार्‍यावर चार आहेत. किनार्‍यांवरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे चांगलेच सामर्थ्य यामुळे प्राप्त झालेले आहे.

 बहुविधपैलू विशेष जहाजे

‘अ‍ॅडव्हान्स्ड ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स’ या १०५ मीटर लांब आणि २,३०० टन वजनाच्या नौका  तटरक्षक दलातील सर्वात मोठ्या नौका आहेत. ‘ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स’ ९० मीटर लांब आणि दोन हजार टन वजनाच्या नौका असतात.  तटरक्षक दलातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या या नौका १९८० पासून सेवेत आहेत. ‘फास्ट पेट्रोल व्हेसल’ या ५० मीटर लांब आणि सुमारे ३०० टन वजनाच्या या गस्ती नौका आहेत. ‘इंटरसेप्टर बोट्स’ उथळ पाण्यात, जलदगती हस्तक्षेप करण्यास योग्य असतात.  तटरक्षक दलाने दोन हजार साली ‘एअर कुशन वेहिकल्स’ प्रचलित केली. ही वाहने ’किनार्‍यालगतच्या पाण्यात, लगतच्या सखल जमिनींमध्ये आणि किनारी प्रदेशांत गस्तीकरिता सामर्थ्य पुरवतात. मात्र, खाड्यांमध्ये, सुंदरबन भागात, सर क्रिक भागात रबरी बोटींची गरज आहे.

 मनुष्यबळातील कमतरता पूर्ण करा

 तटरक्षक दलाच्या अधिकारी व खलाशांचे प्रशिक्षण हिंदुस्थानी  नौदलावर अवलंबून आहे.  तटरक्षक दलाचे खलाशी नौदलासोबतच चिल्कामध्ये शिकतात. अधिकारी उत्तर केरळमधील इझिमाला येथे.  तटरक्षक दलाची क्षमता दुप्पट करण्यात आलेली आहे. पूर्वी ५० ते ६० अधिकारी दरवर्षी प्रशिक्षण घेत असत.  नौदलाची प्रशिक्षण क्षमता १०० टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने ती आता सुमारे १३० अधिकारी दरवर्षी इतकी झालेली आहे. तसेच, चिल्कात पूर्वी ३५० खलाशी प्रत्येक वर्षी प्रशिक्षण घेत असत. मनुष्यबळातील २० टक्के कमतरता पुढील १० ते १२ वर्षांनंतरच पूर्ण केली जाईल.

 कायदेशीर मर्यादा आणि तटरक्षक दलाच्या सशक्तीकरणातील त्रुटी

हिंदुस्थानी  तटरक्षक दलासमोरच्या कर्तव्यपूर्तीच्या आड येणार्‍या कायदेशीर मर्यादा, नौका ताब्यात घेणे, अनधिकृत सर्वेक्षणावरील कारवाई, अवैध माहिती संकलनावरील कारवाई इत्यादींबाबत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेकरिता अशा कायदेशीर मर्यादा उठवणे आवश्यक आहे. सखोल समुद्रात, प्रादेशिक पाण्यापलीकडे, अनन्य आर्थिक क्षेत्रात, मासेमारी करणार्‍या नौकांच्या नियमनार्थ कायदेच उपलब्ध नाहीत. आवश्यक नियमांअभावी, भारतीय तटरक्षक दल सखोल समुद्रातील मासेमारी नौकांवर लक्ष ठेवू शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षेकरिता आवश्यक कायदे पुढच्या दोन वर्षांत तरी मान्य केले जावेत.

आणखी काय करता येऊ शकेल?

तांत्रिक ज्ञानाचा आणि मनुष्यबळ सामर्थ्याचा योग्य वापर करण्यात यावा. किनार्‍यावरील वाढती निगराणी, गस्त आणि इतर दलांसोबत संयुक्त किनारी सुरक्षा कवायतींचे आयोजन केले गेले पाहिजे. गुप्तवार्ता दर्जा वाढवणे आणि समुद्री पोलीस,  तटरक्षक दल व  नौदल यांच्यातील समन्वयन आणखी सुधारले पाहिजे. तटरक्षक दलाचे नवीन जहाजांचे आगमन गतिमान झाले पाहिजे. निरनिराळ्या वर्गाच्या नौकांची अल्प, सामान्य आणि मध्यम दुरूस्ती योग्य वेळी व्हावी. हा नौका दुरूस्ती कार्यक्रम कार्यक्षमतेने चालवला गेला पाहिजे.  तटरक्षक दलात अधिकार्‍यांची कमतरताही आहे. नियत कालावधीत ही तूट भरून काढली गेली पाहिजे.

 निवृत्त  तटरक्षक दल नौकांचा वापर तरंगत्या चौक्या म्हणून, उच्च जोखीम क्षेत्रांत, खाड्यांमध्ये आणि नदीमुखांत केला जावा.प्रत्येक बंदरात आत आणि बाहेर जायचे रस्ते, बोटी उतरण्याच्या जागा, धक्के, नौका ठेवण्याच्या जागा विकसित होत आहेत. त्याचा वेग वाढला पाहिजे. व्यक्तिगत मच्छीमारांना ओळखपत्र देण्याच्या पद्धती जास्त कार्यक्षम झाल्या पाहिजे. छोट्या नौकांना प्रारण ओळखपत्र (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी) देण्याचाही प्रस्ताव आहे. ते काम लवकर सुरू व्हावे.किनार्‍यावर सुरक्षेसाठी गस्त वाढवण्यात आली पाहिजे. सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात यावी. याशिवाय सर्व ‘लॅण्डिंग पॉईंट्स’वर नाकाबंदी केली जावी. ‘२६/११’ ची देशात पुनरावृत्ती होऊ शकते का? महानगरांत, ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ असताना, कुठलाही दहशतवादी जीवंत परत जाऊ शकणार नाही, याची देशाला खात्री असावी.