#Coronavirus काय सांगता आता प्राण्यांनाही कोरोना? हैदराबादमध्ये 8 सिंह पॉझिटिव्ह

फाइल फोटो

देशात कोरोनाचे ( #Coronavirus ) थैमान सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. असे असतानाच आता प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथील नेहरू झुलॉजीकल पार्कमध्ये ( nehru zoological park ) 8 आशियायी सिंह कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी माहिती दिली की 29 एप्रिल रोजी सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बॉयोलॉजी ( CCMB) ने नेहरू झुलॉजीकल पार्कच्या अधिकाऱ्यांना ही तोंडी माहिती दिली की आरटी-पीसीआर टेस्टमध्ये 8 सिंह पॉझिटिव्ह आढळले आहेत. नवभारत टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

नेहरू झुलॉजीकल पार्कमध्ये देखरेख करणारे आणि संचालक डॉक्टर सिद्धानंद कुकरेती यांनी या माहितीला दुजोरा दिलेला नाही, मात्र सिंह पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त फेटाळलेले देखील नाही. डॉक्टर कुकरेती म्हणाले की, सिंहामध्ये कोरोनाची ( Coronavirus ) लक्षणे दिसली आहेत आणि त्यांची टेस्ट केल्याचे वृत्त खरे आहे. मात्र अजून रिपोर्ट मिळालेला नाही. रिपोर्ट मिळाल्यावर आम्ही त्याची माहिती देऊ शकतो, असेही ते म्हणाले.

हैदराबाद शहरातील वाइल्डलाइफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. गिरीश उपाध्ये यांनी सांगितले की गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या एका प्राणिसंग्रहालयात 8 वाघ आणि आणि सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याआधी हिंदुस्थानात मात्र प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्याचे काही वृत्त नव्हते. हाँगकाँगमध्ये कुत्रे आणि मांजरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 24 एप्रिल रोजी पशूवैद्यकांना तपासणी सुरू असताना काही सिंहाना भूक न लागणे, नाकातून पाणी गळणे अशा प्रकारची लक्षणं आढळली. या प्राणीसंग्रहालयात 12 सिंह आहेत त्यांचं वय 10 वर्ष आहे. चार सिंह आणि बाकी सिंहिणी पॉझिटिव्ह असल्याचं हे सूत्र सांगत आहेत.

यानंतर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांसाठी हे ठिकाण बंद राहणार आहे. या प्राणीसंग्रहालयात काम करणारे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर प्राण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या