प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी

जीवाभावाच्या दोन जीवलग मैत्रिणी… रूममेट राहिल्याने एकमेकाच्या डावपेजाबद्दल अवगत… अशा जीवलग मैत्रिणींमध्ये रंगलेल्या प्रथम महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत सांगलीचे प्रतिनिधीत्व करणाऱया प्रतिक्षा बागडीने कल्याणचे प्रतिनिधीत्व करणाऱया वैष्णवी पाटील हिला तीन मिनिटांत चितपट करून महिला महाराष्ट्र केसरीची पहिली मानाची गदा जिंकून इतिहास घडविला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा तालिम संघाच्या वतीने सांगलीतील डॉ. पतंगराव कदम क्रीडानगरीमध्ये नेटक्या अन् देखण्या वातावरणात दोन दिवशीय पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची शुक्रवारी सांगता झाली. बलदंड प्रतीक्षा बागडी अन् चपळ वैष्णवी पाटील एकमेकाना भिडल्या. प्रतिक्षाने काही क्षणातच एकेरी पटात घुसून पाठीवर स्वार होत 2 गुण वसूल केले. पुन्हा एकेरी पटात घुसून प्रतिक्षाने वैष्णवीला आखाडय़ाबाहेर नेत आणखी 2 गुणांची कमाई केली. मग वैष्णवीनेही एकेरी पटात घुसून प्रतीक्षाचा पायाचा पंजा पकडून तिला उचलून आपटले अन् 4 गुणांची कमाई केली. लढत 4-4 अशी बरोबरीत आल्याने कुस्तीचा थरार वाढेल अशी कुस्तीशौकिनांना अपेक्षा होती. मात्र, प्रतिक्षाने तिसऱया मिनिटाला लपेट डाव मारुन वैष्णवीला चितपट करून प्रतीक्षा संपविली.

हवालदाराची पोरगी झालीमहाराष्ट्र केसरी

प्रतिक्षा बागडी ही सांगलीतील पोलीस हवालदार रामदास बागडी यांची सुकन्या होय. आपल्या लेकीचा पराक्रम ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी प्रतीक्षाची आई-वडील, आजी व इतर सर्व कुटुंबीय मैदानावर उपस्थित होते. या सर्वसामान्य कुटुंबातील या नातेवाईकांच्या चेहऱयावरील आनंद ओसंबून वाहत होता. एवढेच नव्हे, तर प्रतीक्षाच्या महाराष्ट्र केसरीची फायनल पाहण्यासाठी पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.