सांगलीतील स्पर्धाच अधिकृत; अनधिकृत स्पर्धेत खेळू नका !

पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेचा थरार ठरल्याप्रमाणे सांगलीत रंगणार असून स्पर्धा आयोजकांची या स्पर्धेसाठी तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. बहुतांश जिल्हा संघांच्या प्रवेशिका आल्या असून पहिली मानाची चांदीची गदा जिंकून इतिहास घडविण्यासाठी महिला मल्ल आतूर झाल्या आहेत. मात्र, महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच दुसऱया गटानेही या स्पर्धेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सांगलीत होणारी स्पर्धाच अधिकृत असून अनधिकृत स्पर्धेत सहभागी होणाऱया जिल्हा संघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सांगली मिरज रोडवरील क्रीडा संकुलमध्ये ही स्पर्धा 23 व 24 मार्च रोजी होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील सर्व जिह्यांचे तसेच महानगरांचे संघ असे मिळून 45 संघ येणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडू, पंच आणि पदाधिकारी यांच्या निवास-भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ही स्पर्धा क्रीडा संकुलात दोन मॅटवर रंगेल. 23 मार्च रोजी सकाळपासून खेळाडूंचे आगमन, वजन यानंतर दुपारी स्पर्धा सुरू होतील. 24 मार्च रोजी महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी अंतिम लढत होणार आहे. विजेत्यास मानाची चांदीची गदा व इतरांना पुरुष स्पर्धेप्रमाणे बक्षीस दिली जातील.

कुस्तीगीर परिषदेचे प्रमाणपत्रच अधिकृत!

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही अधिकृत संघटना होय. न्यायालयानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अस्थायी समिती कधीच बरखास्त झाली आहे. त्यामुळे सांगलीमधीलच पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा अधिकृत स्पर्धा आहे. याच स्पर्धेतील प्रमाणपत्र महिला मल्लांसाठी शासकीय सुविधा, नोकरी किंवा मानधनासाठी उपयोगी पडणार आहे, अशी माहितीही मोहिते यांनी दिली.

दुसऱया गटाची स्पर्धा पुण्यात की कोल्हापुरात?

कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा करताच दुसरा गटही या स्पर्धेच्या आयोजनासाठी सक्रिय झाला. त्यांनी अस्थायी समितीच्या वतीने पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धा पुण्यात 1 ते 7 एप्रिलदरम्यान होईल, अशी घोषणा केली. मात्र, यात मध्येच मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांची एण्ट्री झाली. त्यांनी पुण्यातील ही स्पर्धा कोल्हापूरला स्थलांतरित करून संदीप भोंडवे गटाला तोंडघशी पाडले. आता कोल्हापूरमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात ही स्पर्धा होईल, अशी घोषणा सोमवारी दीपाली सय्यद यांनी केली. राज्य शासनाच्या मान्यतेने ही स्पर्धा होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा अधिकार हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला असतो, यात शासनाच्या मान्यताचा प्रश्नच येत नाही, याची कल्पनाच दीपाली सय्यद यांना नसावी. शिवाय, पुण्यातील स्पर्धेची घोषणा करणारे कोणीच दीपाली सय्यद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसाठी आले नाहीत. त्यामुळे दुसऱया गटाची स्पर्धा पुण्यात होणार की कोल्हापुरात? याबाबतचा संशयकल्लोळ वाढला आहे.