गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थान देश सोडणाऱ्यांची संख्या तब्बल सवा दोन लाख झाली. केंद्र सरकारने राज्यसभेत यासंबंधीची आकडेवारी जारी केली आहे. 2023 मध्ये 2 लाख 16 हजार 219 हिंदुस्थानी नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडून अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी मागील पाच वर्षांत म्हणजेच 2019 ते 2023 यादरम्यानची आकडेवारी संसद सभागृहात सादर केली. या पाच वर्षांत किती हिंदुस्थानी नागरिकांनी आपले नागरिकत्व सोडले याबाबत त्यांनी लेखी उत्तर दिले. तसेच 2011 ते 2018 या वर्षातील आकडेवारीसुद्धा त्यांनी राज्यसभेत मांडली. 2023 च्या तुलनेत 2022 मध्ये 2,25,620 लोकांनी हिंदुस्थानी नागरिकत्व सोडले होते.
किती जणांनी सोडला देश
वर्ष देश सोडणाऱ्यांची संख्या
2019 1 लाख 44 हजार 017
2020 85 हजार 256
2021 1 लाख 63 हजार 370
2022 2 लाख 25 हजार 620
2023 2 लाख 16 हजार 219
नोकरीच्या संधी कमी
हिंदुस्थानात गेल्या 10 वर्षांपासून नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. अनेक हिंदुस्थानी तरुण नोकरीसाठी विदेशात जात आहेत. विदेशात चांगला पगार, कामाचे चांगले वातावरण मिळत आहे. त्यामुळे एखाद्या विषयात पदवी घेतल्यानंतर ते हिंदुस्थानात नोकरी मिळत नसल्याने परदेशात जाण्याचा मार्ग निवडतात. अनेक जण विदेशात स्थायिक होतात. गेल्या 10 वर्षांपासून विदेशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोणत्या देशात जाताहेत लोक
हिंदुस्थान देश सोडल्यानंतर लोकांची पहिली पसंती अमेरिका देश आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, न्यूझिलंड, जर्मनी, सिंगापूर, नेदरलँड, स्विडन यासारख्या देशांना हिंदुस्थानी लोक पसंती देतात. काही लोकांनी चीनलाही पसंती दिली.
हिंदुस्थानी पासपोर्ट
हिंदुस्थानी पासपोर्ट 82 व्या क्रमांकावर आहे. या पासपोर्टचा वापर करून केवळ 58 देशांत व्हिसावर फ्री प्रवेश मिळतो, तर याच्या उलट अमेरिकेच्या पासपोर्टवर 186 देशांत फ्री प्रवेश मिळतो. ब्रिटिश पासपोर्ट असल्यास 190 देशांत, फ्रान्स 192, यूएई 195 आणि ऑस्ट्रेलियाला 189 देशांत फ्री प्रवेश मिळतो.