व्यापाऱ्याची अडीच कोटींची फसवणूक करणाऱ्याला कर्नाटकातून अटक; आरोपींकडून 45 लाख रुपये जप्त

जालन्यातील गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांची दोन कोटी रुपयांना फसवणूक झाली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच रोशन सालदाना या आरोपीला कर्नाटकमधून ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीमध्ये असताना त्याने चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. पोलीस आरोपीसह कर्नाटकात गेले. कर्नाटकातील बँगलोर मँगलोर आदि ठिकाणी माहिती मिळवली. रोशन सालदाना याने या पैशांमधून खरेदी केलेले तीन लाखांचे सोने आणि 45 लाखांची रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींपैकी चंद्रशेखर नरसमुल्ला, चित्रदुर्ग हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यासह इतर दोघेही सध्या फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी या आरोपींचे सर्व बँक खाते गोठवले आहेत.

जालना येथील बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार आणि तक्रारदार संजय मोहनराव शिंगारे (रा. पाणीवेस काद्राबाद, नवीन जालना ) यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. ते श्री बालाजी उद्योग ही कंपनीत भागीदार असून या कंपनीत सोयाबीन तेलाची निर्मिती करण्यात येते. त्यासाठी त्यांना मोठ्या स्वरुपात रोख रकमेची गरज असते. त्यासाठी ते बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात. ते व्यवसायानिमित्ताने मुंबई येथे गेले असता यातील आरोपीने त्यांना सल्ला आणि आश्वासन दिले की, बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी दराने कर्ज आणि फंड उपलब्ध करुन देतो. असे आश्वासन देत आरोपी शिंगारे यांना कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये घेऊन गेला. आरोपीची साई कन्सल्टंट कंपनी चित्रदुर्ग कर्नाटक या कंपनीचे एम.डी. आणि इतर अधिकारी यांची ओळख करुन दिली.

कंपनीचा जबाबदार अधिकारी म्हणुन रोशन सालदाना (रा. बैजल चर्च जवळ, मंगलोर जिल्हा मेगलोर,कर्नाटक) हा स्वतः तक्रारदारांच्या कंपनीमध्ये आला. तसेच त्यांने तक्रारदारांसोबत बैठक घेतली. करारनामा करुन कर्जापोटी तारण म्हणून फिर्यादी कंपनीची कागदपत्रे आणि तक्रारदारांचे 5 कोरे धनादेश घेऊन प्रोसेसींग फिस म्हणुन 2 टक्के रक्कम द्यावी लागेल असा करार केला. श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग कर्नाटक यांच्या मार्फत रोशन सालदाना यांनी तक्रारदाराला आश्वासन देत 250 कोटी रुपये 3 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने 15 वर्षांकरीता देण्याचा करार केला. त्यापोटी 1 टक्के प्रोसेसींग फिस ही तात्काळ जमा करा असे सांगुन त्यानंतर तक्रारदारांना कर्नाटक चित्रदुर्ग येथे बोलावुन तेथे आरोपीच्या असलेल्या कार्यालयात फिर्यादीसोबत बैठक करुन कर्ज मंजुर झाल्याचे दाखवले. ठरल्याप्रमाणे प्रोसेसींग फिस म्हणून 2 कोटी 50 लाख रुपये रोख बँक खात्यातुन आरटीजीएसद्वारे स्विकारले. तक्रारदारांनी आरोपींना वेळोवेळी कर्जाबाबत विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढुपणा केला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक शाखेस वर्ग झालेला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.बी. एकशिंगे हे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल क्रमांकावरुन आरोपीचे पूर्ण नाव पत्ते शोधुन काढले तसेच तक्रारदारांनी पाठवलेल्या बँक खात्याद्वारे आरोपीची ओळख पटवली आहे. या प्रकरणातील 4 आरोपींपैकी रोशन सालदाना याला अचक करण्यात आली आहे. त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीकडे अपहाराची रक्कम आणि अपहाराचे रकमेतुन खरेदी केलेले सोने असा एकुण 45 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.