पडलेल्या घरांसाठी 2.5 लाखाची मदत, पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज व्याजासह माफ करणार!

440

महापुरामुळे घर पडलेल्या कुटुंबियांना घर उभारणीसाठी शासनामार्फत अडीच लाखाची मदत केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हेब्बाळ, हिटणी, नांगनुर येथील पूरपरिस्थितीच्या नुकसानीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी हेब्बाळ येथे ते बोलत होते.

पूरग्रस्त कुटुंबाच्या पडलेल्या घराची उभारणी करण्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, मात्र घर उभारायचे आहे त्या ठिकाणी अथवा अन्य ठिकाणी करण्याबाबतचा निर्णय गावकऱ्यांनी एकत्र बसून घेणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय अथवा खासगी जागा शोधून त्याठिकाणी घरांची उभारणी करावी, घर उभारणीसाठी शासन, स्वयंसेवी सेवाभावी संस्था तसेच लोकसहभागातून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास प्रसंगी खासगी जागा शासन खरेदी करण्याबाबतही शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पूरग्रस्तांच्या घरासाठी अडीच लाखाची मदत करण्यात येणार असून नवीन घर बांधेपर्यंत त्यांना इतरत्र भाड्याने राहण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार रुपये एकरकमी उपलब्ध करुन दिले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या