धक्कादायक! दारूसाठी मित्राच्या पत्नीला जिवंत जाळलं

9

सामना ऑनलाईन । सीतामढ़ी

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमध्य़े घडली आहे. बिहारमधील सीतामढी येथे रागाच्या भरात हे भयंकर कृत्य करण्यात आलं आहे. अलका मिश्रा असं या मृत महिलेचं नाव असून या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू होण्याच्या आधी या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी अलका यांचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यामध्ये अलका यांनी पोलिसांना आरोपींची नावं सांगितली होती. अलका यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांचे पती राजीव मिश्रा यांचे त्याच गावात राहणारे बीएस गिरी आणि अमित गिरी हे दोन मित्र होते. शुक्रवारी हे दोघेही अलका यांच्या घराजवळ आले आणि त्यांच्या पतीकडे दारू विकत घेण्यासाठी पैसे मागू लागले. मात्र अलका यांच्या पतीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी दारूसाठी पैसे मागण्याच्या हेतूने ते मित्र त्यांच्या घरी आले. पण तेव्हा अलका यांचे पती घरी नव्हते. अलका घरी एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्याच्यावर रॉकेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.

अलका यांचे पती राजीव यांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार मुंबईमध्ये ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र एका महिन्यापूर्वीच ते आपल्या कुटुंबासह गावी राहायला आले होते. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा घरी परतल्यानंतर राजीव यांना आपली पत्नी जळताना दिसली. त्यांनी आग विझवत अलका यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यानचं अलका यांचा मृत्यू झाला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या