गांजा, चरस विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे शहरात गांजा, मॅफेड्रॉन, चरसह इतर अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वानवडी भागात ही कारवाई करण्यात आली.

लायनल लेझली मेस्करेनस (33, रा. वानवडी), रसल एन्थोनी रेनॉल्ड चंदनशिव (21, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान वानवडी भागात दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमलदार साहील शेख, अझीम शेख यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा, चरस, मॅफेड्रॉन आढळून आले. त्यांच्याकडून अंमली पदार्थांसह दुचाकी, मोबाईल असा 11 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिंगबर चव्हाण, अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव, मयूर सुर्यवंशी, चेतन गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.