2 आयुर्वेदीक डॉक्टरांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुण्यातील सत्र न्यायालयाने मंगळवारी 2 आयुर्वेदीक डॉक्टरना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या डॉक्टरांनी एका गर्भवती महिलेची सिझेरिअन शस्त्रक्रिया करून प्रसुती केली होती. या डॉक्टरांकडे त्यासाठीचे पुरेसे ज्ञान नसतानाही त्यांनी ही शस्त्रक्रिया केली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच या महिलेचा मृत्यू झाला होता. एप्रिल 2012 साली घडलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला असून या डॉक्टरांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायालयाने जितेंद्र सुरेश शिंपी (वय-46 वर्षे) आणि सचिन देशपांडे (वय-38 वर्षे) यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये दगावलेल्या महिलेच्या पतीस देण्याचे आदेश दिले आहेत. शिंपी याला 6 महिन्यांच्या अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. परवान्याचे नुतनीकरण न करताच नर्सिंग होम चालवत असल्याबद्दल त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांना शिक्षा सुनावत असताना न्यायालयाने भूलतज्ज्ञ डॉ.विजय अगरवाल यांची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे.

शस्त्रक्रिया केल्याच्या दुसऱ्या दिवशी राजश्री जगताप यांना रक्तस्त्राव सुरू झाला होता. याबाबत जेव्हा डॉक्टरांना कळवण्यात आले तेव्हा त्यांनी सचिन देशपांडे यांच्या गाडीतून दुसऱ्या रुग्णालयात राजश्री यांना नेले होते. 2 मे रोजी राजश्री यांचा मृत्यू झाला होता. आपल्या पत्नीच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप राजश्री यांचे पती अनिल यांनी केला होता. डॉक्टरांनी तज्ज्ञांना बोलावले नाही आणि शिंपी तसेच देशपांडे हे तज्ज्ञ डॉक्टरही नव्हते असे आपल्याला नंतर कळाल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले आहे. राजश्री परत येणार नाही मात्र तिला न्याय मिळायलाच हवा यासाठी अनिल यांनी डॉक्टरांना न्यायालयात खेचण्याचे निश्चित केले होते. पुणे मिररने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या