यंदा घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

1268

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने अखेर मार्गदर्शक सूचना जाहीर केले असून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची 4 फूट तर घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. त्यामुळे उत्सव होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सार्वजनिक मंडळांशी चर्चा करताना लवकरच यासंदर्भातील नियमावली जाहीर करु, असे आश्वासन मंडळांना दिले होते. त्यानंतर अखेर आज राज्य सरकारच्या गृह विभागाने यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करीत उत्सवाबाबत संभ्रम दूर केला आहे. या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

त्याशिवाय यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणरायाची मूर्ती 4 फुटांची तर घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय गणेशाची मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन घरीच करावे किंवा कृत्रिम तलावांचा वापर करावा. याउलट ज्या गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य आहे. त्यांनी मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यातील विसर्जनाच्यावेळी करावे, असे आकाहन यावेळी गृह विभागातर्फे करण्यात आले आहे.

काय सांगतात मार्गदर्शक सूचना
– वर्गणी आणि देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा
– जाहिरातींमुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची काळजी घ्यावी, त्याशिवाय सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती कराव्यात
– सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक कार्यक्रम राबवावेत
– ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादीद्वारे गणेशदर्शनाची व्यवस्था करावी
– मंडपात निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था कराकी
– आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये
– महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

उत्सव होणार की नाही, अशी परिस्थिती होती. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जो पाठिंबा दर्शविला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार, राज्य सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. आपण सर्वांनीच उत्सव साजरा करताना महापालिका, पोलीस आणि इतर संबंधित प्रशासनावर ताण पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि सर्वांना सहकार्य करावे. – ऍड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

आपली प्रतिक्रिया द्या