अ‍ॅमेझॉन स्टोअर्सची फ्रॅन्चायजी देण्याचे अमिष दाखवून 2 लाख 64 हजारांची फसवणूक

अ‍ॅमेझॉन इझी स्टोअर्स आणि लॉजिस्टीकची फ्रॅन्चायजी देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना अहमदपूरच्या शिरुर ताजबंद येथे घडली आहे. यात फिर्यादीला 2 लाख 64 हजार 250 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर पोलीस ठाण्यात उमा महेश्वर बालया स्वामी रा. इंदिरा नगर याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अ‍ॅमेझॉन इझी स्टोअर्स आणि लॉजिस्टीकची फ्रॅन्चायजी देण्याचे अमिष दाखवून एकाने मोबाईलवर सातत कॉल करून सांगितले. तसेच त्याने लिंक पाठवून फॉर्म भरून घेतला. फॉर्म भरत असताना 15 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. एचडीएफसी बँकेच्या खात्यात ही रक्कम ऑनलाईन भरण्यात आली. त्यानंतर सेक्युरीटी डिपॉजीट म्हणून 38 हजार 750 रुपये भरण्यास सांगितले तर दुसऱ्या दिवशी अकाऊंट ओपन करण्यासाठी 85 हजार रुपये भरण्यास सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेलर लिस्ट व फ्रॅन्चायजी फी मिनी शॉप साठी म्हणून 1 लाख 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. अप्रुअल फॉर्म व पेमेंट स्लीप पाठवून मुखर्जी ट्रान्सपोर्ट एजन्सी च्या नावाने 98 हजार 650 रुपयाचे बील फिर्यादीला पाठवण्यात आले. संशय आल्याने कंपनीच्या पत्त्यावर जाऊन पडताळणी केली असता तेथे कोणतेही कार्यालय नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित मोबाईलधारकाने 2 लाख 64 हजार 250 रुपयांची फसवणूक केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारकाविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.