दोन दिवसांपूर्वी उभारलेल्या कोविड रुग्णालयातून दोन कैद्यांचे पलायन

अपुऱ्या पोलीस सुरक्षेअभावी संभाजीनगर शहरातील कोविड रुग्णालयातून हर्सूल तुरुंगातील दोन कैद्यांनी पळ काढल्याची घटना रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे रूग्णालयात 29 कैदी असताना फक्त दोनच पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. हर्सूल कारागृहात रमजान ईदची सामुहिक नमाज पठण केल्याने कारागृहात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यात कोरोनाची लक्षणे असलेल्या 103 कैद्यांची तपासणी केली असता 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी उघड झाले होते. कारागृहातील अन्य कैद्यांना याची लागण होऊ नये यासाठी किलेअर्क येथील शासकीय कार्यालयात तात्पुरते कोविड रुग्णालय उभारून 29 कैद्यांना ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास शौचालयाचा बहाणा करून जटवाडयातील अकरम खान गयास खान आणि नेहरू नगरातील सैय्यद शेख सैय्यद असद या दोघांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा फोडून पळ काढला.

रुग्णालयाच्या बाथरूमच्या खिडकीतून पळ काढल्यानंतर अंधाराचा फायदा घेत दोघांनी हिमायतबाग येथून पळ काढण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी काही तरूण बसले होते. तरूणांनी दोघांना अडवले असता त्यांनी आम्हाला काही लोक मारहाण करत असल्याचा बहाणा करत ते तेथून निसटले. संशय आल्याने तरुणांनी गस्तीवर असलेल्या सिटीचौक पोलीसांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सिटीचौक पोलिसांनी तत्परता दाखवली असती त्या दोघांना पकडत आले असते.

कोविड रूग्नालयात 29 कैद्यांवर उपचार सुरु आहेत. यातील काही अट्टल आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले कैदीही आहेत. या कैद्यांच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाने फक्त दोनच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तर मेन गेटवर बेगमपुरा पोलीस ठाण्याचा कर्मचारी तैनात करण्यात आला होता. या कैद्यांचा सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली नव्हती. अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळेच कैद्यांनी रूग्णालयातून पळ काढल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या