राक्षसवाडी तलावातून अवैध वाळूउपसा करणाऱया दोघांना अटक; 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर जिल्हा पोलीस दलाने अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारातील तळ्यातून अवैध वाळूउपसा करणाऱया तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन जेसीबी, दोन ट्रक्टरसह एक ब्रास वाळू, असा 50 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

सागर राजेश शिंदे (वय 27, रा. वडळी, ता. श्रीगोंदा) व शुभम दत्तात्रय अधोरे (वय 24, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्यांची नावे असून, संतोष ऊर्फ बंटी कोथंबिरे (रा. साळनदेवी रोड, ता. श्रीगोंदा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील संभाजी कोतकर, सचिन आडबल, रोहित मिसाळ व मयूर गायकवाड हे कर्मचारी कर्जत तालुक्यात अवैध वाळूउपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी राक्षसवाडी तळ्यात काहीजण जेसीबीद्वारे वाळूउपसा करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी गस्त घालणाऱया पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पथकाने राक्षसवाडी तळ्याजवळ गेले असता, तळ्यात दोनजण जेसीबीच्या साहाय्याने वाळूउपसा करून ट्रक्टर ट्रॉलीमध्ये भरताना दिसले. त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकून दोनजणांना ताब्यात घेतले, तर अंधाराचा फायदा घेत दोनजण फरार झाले आहेत. त्यांच्याकडे वाळूउपशाचा कोणताही परवाना नसल्याने पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन जेसीबी, दोन ट्रक्टर, दोन ट्रॉली आणि एक ब्रास वाळू असा  50 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.