श्रीनगरची जबाबदारी दोघा महिला अधिकाऱ्यांकडे, कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक

830

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीनंतर दोन महिला अधिकारी श्रीनगरची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

2013 साली आयएएस झालेल्या डॉ. सईद सहरीश असगर या कश्मीर खोऱयातील लोकांना त्यांच्या नातेवाईकांबरोबर फोनवरून बोलू देण्याची आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत तर 2016 बॅचच्या आयपीएस पी. डी. नित्य यांच्यावर काही किलोमीटरमधील भागाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांच्या भागांत ताब्यात आणि अटक करण्यात आलेल्या व्हीआयपी लोकांना ठेवण्यात आले आहे. संपूर्ण कश्मीर खोऱयात या दोघाच महिला अधिकाऱयांना नेमण्यात आले आहे.

– असगर यांना माहिती संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आले होते. मात्र, 370 कलम हटवून जम्मू-कश्मीर केंद्रशासित केल्यानंतर त्यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे काम सोपवण्यात आले आहे. एकाच वेळी कठोर आणि नरम भूमिका घेत लोकांना समजावे लागते, असे त्या म्हणाल्या.

– सिमेंट कंपनीतील व्यवस्थापकाची नोकरी सोडून आयपीएस झालेल्या नित्य श्रीनगरमध्ये सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी आहेत. संतापलेल्या लोकांचा सामना इथे करावा लागतो. केमिकल इंजिनीअरिंगमधून बीटेक केलेल्या नित्य यांना आव्हाने पेलायला आवडतात, असे त्या म्हणाल्या.

कश्मीर दौऱयावर येऊ, पण तुमच्या सरकारी विमानाची गरज नाही!
जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे कश्मीर दौऱयाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. ‘आम्ही कश्मीर दौऱयावर येऊ, पण त्यासाठी आम्हाला तुमच्या सरकारी विमानाची गरज नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्षांतील नेत्यांना कश्मीरमध्ये येण्याची परवानगी द्यावी. त्यांना लोकांना आणि सैनिकांना मोकळेपणाने भेटू द्यावे,’ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांना दौऱयासाठी सरकारी विमान उपलब्ध करून देऊ, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या