मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मंडणगड आगारातून 20 बस सोडल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल

मुख्यमंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ या रत्नागिरीतील कार्यक्रमाला मंडणगड आगारातून तब्बल 20 एस.टी.बस सोडल्याने ग्रामिण भागातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

मंडणगड एस.टी.बस स्थानकातून 20 बस रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे आंबवणे, वेरळ, पिंपळगाव या गावांमध्ये नेहमी सोडण्यात येणाऱ्या रात्रीच्या वस्तीच्या एस.टी.बस फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एस.टी. आगार व्यवस्थापकांवर आली. तसेच महाड, खेड, तळेघर या मार्गावरील एस.टी. बसेस रद्द करण्यात आल्या तर दापोली, लोकरवण, भाटघर, अडखळ, बोलाडेवाडी, टाकवली, खेड, साखरी, वेळास, आंबेत, भोळवली, सडे या मार्गावरील एस.टी.बस फेऱ्या आधीच रद्द केल्यामुळे मंडणगड येथे तालूक्याच्या मुख्यालयी विविध शासकिय कामांसाठी, बाजारहाट करण्यासाठी तसेच वैदयकिय कारणासाठी येण्यासाठी लोकांची मोठीच गैरसोय झाली.

मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे चाकरमानी मोठया संख्येने मंडणगडात आले आहेत. ते या ना त्या वाहनाने तालूक्यातील ग्रामीण भागातून मंडणगडात तालूक्याच्या ठिकाणी आपल्या कामांसाठी आले होते. त्यांना परतीच्या प्रवासासाठी एस.टी.बस स्थानकात चार चार तास ताटकळत एस.टी.ची वाट पाहत बसून रहावे लागले. आगारातच एस.टी.बस उपलब्ध नसल्याने आगार व्यवस्थापकांकडून बस आल्यावर बस सोडण्यात येईल अशी वेळ काढू उत्तर देऊन एस.टी. व्यवस्थापनाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. एस.टी. बसच लागत नसल्याने अखेर प्रवाशांना खाजगी वाहनांना मोठे भाडे देऊन आपल्या परतीची सोय करावी लागली.