सोनू सूदने केली 20 कोटींची करचोरी, आयकर विभागाने केला दावा

अभिनेता सोनू सूदने 20 कोटींहून अधिक रुपयांची करचोरी केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. तसेच क्राऊडफंडिंगद्वारे परदेशी गुंतवणूकदारांकडून 2.1 कोटी रुपये गोळा करत परदेशी देणगी नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचेही आयकर विभागाने निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी ईडीदेखील आता चौकशी करण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून सोनू सूदशी संबंधित मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूर, जयपूर आणि गुरूग्रामसहित 28 ठिकाणच्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली. आयकर विभागाच्या माहितीनुसार छापेमारीदरम्यान त्यांना काही आक्षेपार्ह नोंदणी आणि करचुकवेगिरीचे पुरावे आढळले आहेत. सोनूने बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या रूपातून बेहिशेबी पैसा जमा केला आहे. आतापर्यंतच्या तपासात अशा दोन नोंदीचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

ट्रस्टच्या नावावर जमवले 18.94 कोटी

लॉकडाऊनमध्ये सोनूने ‘सूद चॅरिटी ट्रस्ट’ सुरू केली आहे. आतापर्यंत ट्रस्टला 18 कोटी 94 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यातील केवळ 1 कोटी 90 लाख रुपये मदतकार्यासाठी खर्च केले आहेत. उर्वरित 17 कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत, असे आयकर विभागाने सांगितले आहे.

लखनौच्या एका कंपनीचे 11 लॉकर्स

लखनौमधील एका इन्फ्रा पंपनीत सोनूची भागीदारी आहे. या ठिकाणी करचोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. पंपनीच्या छापेमारीत 1.8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून यावेळी पंपनीचे 11 लॉकर्सदेखील आढळल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. आयकर विभागाला या पंपनीच्या 175 कोटींच्या आर्थिक व्यवहाराविषयीदेखील शंका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या